कडधान्याच्या किमतीत २० टक्‍क्‍यांनी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडधान्याच्या किमतीत २० टक्‍क्‍यांनी वाढ
कडधान्याच्या किमतीत २० टक्‍क्‍यांनी वाढ

कडधान्याच्या किमतीत २० टक्‍क्‍यांनी वाढ

sakal_logo
By

माणगाव, ता. १६ (बातमीदार)ः रब्बी हंगामातील कडधान्ये पिके काढणीस सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील कडधान्य काढणी जोरात सुरू असून सुरुवातीलाच ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्‍यामुळे कडधान्याचे दरही १० ते २० टक्‍क्‍यांनी महागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रब्बी हंगामात तयार झालेल्या कडधान्य पिकाच्या झोडणीला तालुक्यात सुरुवात झाली असून पीक बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कडधान्य काहीसे महाग झाली असून मूग, वाल, मटकी, चवळी, हरभरे किलोमागे दहा ते वीस रुपयांनी महागले आहेत.
गेल्या वर्षीही अवकाळी व खराब हवामानाचा फटका कडधान्य शेतीला बसला होता. यंदा खराब हवामानामुळे कडधान्याचे उत्पादन घटल्‍याचे शेतकर्‌यांचे म्‍हणणे आहे.
गावठी कडधान्य खाण्यास रुचकर असल्याने ग्रामीण भागासह शहरी ग्राहकांकडून त्‍यांना विशेष पसंती मिळत आहे. घाऊक व किरकोळ अशा स्‍वरूपात त्‍यांची विक्री सुरू झाली असून शेतकऱ्यांकडून थेट कडधान्य खरेदी करताना अनेकजण दिसतात. पुढील काही दिवसात भाव आणखी वाढतील, असे शेतकरी उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे.

गावठी कडधान्य पिके काढणी, झोडणी सुरू झाली आहे. रुचकर असल्याने शहरी भागातून कडधान्यांना मोठी मागणी असते. नुकतीच पिकांची झोडणी सुरू झाली आहे. पुढील काही दिवस पिकांना चांगली मागणी असेल. यंदा १० ते २० टक्के भाववाढ झाली आहे.
- चंद्रभागा खडतर, कडधान्य विक्रेता

कडधान्याचे प्रतिकिलो दर रुपयांत
प्रकार गतवर्षी यंदा
मूग. १०० ते ११०, ११० ते १३०
वाल. १०० ते ११०, ११० ते १३०
मटकी. ८० ते १००, १२० ते १३०
हरभरे.९० ते १००, ११० ते १३०
चवळी ९० ते १००, ११० ते १२०

....................

बाजारपेठेत गावठी कडधान्याला पसंती
रसायनी, ता. १६ (बातमीदार) ः वासांबे मोहोपाडा बाजारपेठेत परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांचे कडधान्ये विक्रीसाठी येऊ लागली आहेत. नागरिकांकडून गावठी कडधान्यास पसंती मिळत असून चांगला भाव मिळत असल्याने विक्रेते समाधान व्यक्त करीत आहे.
रसायनी परिसरातील चावणे, आपटे, वडगाव, मोहोपाडा पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या भात पिकानंतर वाल, चवळी, हरभरा, मटकी, मूग आदी कडधान्याचे पीक घेतात. यंदा पेरणीनंतर खराब हवामानामुळे पिकाला फटका बसला असून उत्‍पादन कमी झाले आहे. तरी वाल आणि चवळीच्या ओल्या शेंगाना चांगला भाव मिळत असल्‍याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
वासांबे-मोहोपाडा येथील बाजारपेठेत चार-पाच दिवसांपासून वाल, मूग, चवळी, हरभरा आदी कडधान्य शेतकरी विक्रीसाठी घेऊन येत आहे. किलोला १५० ते १६० रुपये दर मिळत आहे. स्थानिकांकडून गावठी कडधान्याला पसंती मिळत असल्‍याचे शीतल म्हात्रे यांनी सांगितले.

दुबार वाल, हरभरा, चवळी, हरभरा, मटकी आदी कडधान्यांच्या पिकाला पेरणीनंतरच्या खराब हवामानाचा फटका बसला. त्यामुळे यंदा पीक कमी आले आहे. त्यामुळे भाव वाढले आहे.
- सुरेखा कोडींलकर, शेतकरी, जांभिवली