अवकाळीमुळे नागरिकांची तारांबळ

अवकाळीमुळे नागरिकांची तारांबळ

रसायनी, ता. २१ (बातमीदार) : रसायनी परिसरात मंगळवार (ता. २१) सकाळी आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्‍याने शालेय विद्यार्थी, कामगार, वीट व्यावसायिक आदींची तारांबळ उडाली. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने सर्वांनाच उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. गुढीपाडवानिमित्त बाजारात खरेदीसाठी गर्दी होते. मात्र पावसामुळे वासांबे-मोहोपाडा बाजारपेठेत सकाळी अकरा वाजेपर्यंत खेडे गावातील भाजी विक्रेते, फळविक्रेते दाखल झाले नव्हते. तसेच ग्राहकांचीही फारशी वर्दळ नव्हती.
पावसाने सकाळीच जोरदार बरसात केल्‍याने कार्यालयात जाणाऱ्या नोकरदारांची, परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याची धावपळ झाली. वीटभट्टी मालकांचीही धांदल उडाली. नुकसान टाळण्यासाठी बहुतेक वीटभट्टी मजूर, मालकांनी कच्च्या वीटा भिजू नये म्हणून, एकावर एक रचून ठेवल्या, तसेच काहींनी प्लास्टिक ताडपत्रीचे वीटा झाकल्‍या. जवळपास तासभर पावसाचा जोर होता. बदलत्‍या हवामानामुळे आंबा, काजू पिकाला, भाजीपाला तसेच कडधान्य पिकाला मोठा बसला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

.....................

अवकाळीने शेतकरी हवालदिल
आंबा, काजू, कडधान्य पिकाला धोका; गुरांचा चाराही भिजला
माणगाव, ता.२१ (बातमीदार) ः आठवडाभरापासून तालुक्‍यात ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्‍याने आंबा, काजू, कडधान्य पीक धोक्‍यात आले आहे. वीटभट्‌टी व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले असून गुरांचे वैरणही भिजले आहे.
लांबलेल्या पावसाने वीटभट्टी व्यवसाय यंदा उशिराने सुरू झाला. ढगाळ वातावरणामुळेही मातीच्या वीटा सुकण्यास विलंब लागला. त्‍यात गेल्‍या आठ दिवसांपासून सुरू असलेल्‍या अवकाळीने वीटभट्टीमालक चिंतेत आहेत. बदलत्‍या हवामानाचा आंबा, काजूच्या उत्पादनाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी मोहर गळला आहे. तर पावसामुळे फळगळती झाली आहे. शेतकऱ्यांनी माच करून ठेवलेली वैरण भिजली असून गुरांच्या दाणा-पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रब्‍बी हंगामातील कडधान्ये भिजली असून काढणी व झोडणी लांबणीवर केली आहे. पिके बाधित झाल्‍याने शेतकऱ्यांच्या उत्‍पन्नावरही परिणाम होणार आहे.

ढगाळ वातावरण, अवकाळी पावसामुळे कडधान्य पिकांसह सर्वच पिकांचे नुकसान होत आहे. फळ पिके व वैरणवर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्‍यता आहे.
- बाळाराम भोनकर, शेतकरी

यंदा रब्‍बी हंगामातील कडधान्य व इतर पिकांची चांगली लागवड झाली आहेत. मात्र अचानक आलेल्‍या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती शक्‍यता आहे. बदलत्‍या हवामानामुळे पिकावर रोगराई पसरण्याचा धोका बळावला आहे.
- दत्ताराम यादव, शेतकरी, माणगाव

माणगाव ः कडधान्य शेती भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com