
स्कूल बसच्या भाड्यात ३० टक्क्यांनी वाढ
वडखळ : कोरोनामुळे दीर्घकाळ शाळा बंद असलेल्या शाळा शैक्षणिक वर्षापासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, वर्षभरात पेट्रोल, डिझेल व सीएनजीच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाल्याने स्कूल बसच्या भाड्यामध्येही ३० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. याचा फटका पालकांच्या खिशावर पडत आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने स्कूल बसची सेवा बंद होती. टप्प्या-टप्प्याने शाळा सुरू झाल्यानंतर पालकच मुलांची शाळेतून ने-आण करत होते. परंतु, आता शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत.
त्यामुळे नोकरदार पालकांना मधल्या वेळेत पाल्याला घरी आणणे अडचणीचे होऊ शकते. यासाठी त्यांनी स्कूल बसकडे धाव घेतली. पण, त्यांनी तब्बल ३० टक्के भाडेवाढ केल्याने पालकांना आता जास्तीचे पैसे भरावे लागणार आहेत. पूर्वी पेण शहरातील एका विद्यार्थ्यासाठी साधारण ७०० रुपये घेतले जात होते. आता स्कूल बस, व्हॅन, रिक्षाचालकांनी ९०० रुपये घ्यायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातून पेण शहरात येणार्या विद्यार्थ्यांना १३०० ते १५०० रुपये भाडे आकारले जात आहे. कोरोनाकाळात वाहनचालकांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. त्यातच राज्य सरकारने स्कूल बसचा दोन वर्षांचा रोड टॅक्सही माफ केलेला नाही. वाढती महागाई, डिझेलचे दर सतत वाढत असल्यामुळे ३० टक्के भाडेवाढ करण्यात आल्याचे स्कूल बस वाहनचालकांकडून सांगण्यात येत आहे.
एकीकडे महागाई वाढत आहे. त्यातच स्कूल बसचे भाडे वाढल्याने महिन्याचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. सर्वसामान्य पालकांना पाल्याला बसने पाठवणे थोडे महागच वाटत आहे.
- सुशील कोठेकर, पालक
Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00827 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..