
आला पावसाळा सापापासून दूरच राहा
सर्पदंशापासून सावधानः
आला पावसाळा सापापासून दूरच राहा
प्रदीप मोकल, वडखळ
पावसाळा सुरू होताच अनेक साप बिळाबाहेर पडतात. साप हा प्राणी बघितला तर अनेकांची बोबडी वळते. तो चावल्यानंतर काय होईल, याची कल्पनाही करवत नाही. साप चावण्याच्या घटनाही गावाकडे, शेतात काम करताना अनेकदा घडतात. ज्या ठिकाणी घनदाट झाडी असतात, तेथे सापांचा वावर हमखास असतो. सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेकांनी सर्पदंशापासून सावध राहण्याच्या सूचना सर्पमित्र आणि स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.
------
साप हा सहसा स्वत:हून कोणाला चावत नाही. त्याच्यावर पाय पडला किंवा त्याला तुम्ही आक्रमण करताय असे वाटू लागले की हल्ला चढवतो. साप चावल्यावर कधी कधी कळतही नाही. शरीरात काही बदल होऊ लागतात. अशा वेळी तातडीने सरकारी दवाखान्यात उपचार घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने मानवी वस्तीत आढळणारे चार प्रमुख विषारी साप आहेत. हेच साप रायगड जिल्ह्यातही आढळतात. यामध्ये नाग, मण्यार, घोणस व फुरसे सापाच्या दंशामुळे सर्वाधिक लोक मरतात. सर्पदंशावर निव्वळ एकमात्र उपाय म्हणजे सापाचे प्रतिविष या व्यतिरिक्त सर्प दंशावर दुसरा कोणताही उपाय नाही. भारतात बिनविषारी सापांची संख्या जास्त आहे, तर विषारी साप कमी आहेत. अनेकदा प्रथमोपचार न केल्याने आणि मरण्याच्या भीतीनेच अनेकदा रुग्ण दगावतात. अशा वेळी सर्पदंश झालेल्या व्यक्तीस धीर देऊन सतत जागे ठेवावे. कारण रक्ताभिसरण या वेळी वेगाने होत असते. अशा वेळी तातडीने सरकारी दवाखान्यात दाखल करावे.
घ्यावयाची काळजी
* घराच्या आसपास साप येऊ नये, यासाठी भिंतींना पडलेली भोक ,कुंपणाच्या कडेला असलेली बिळे बुजून टाकावीत.
* घराच्या परिसरात कचऱ्याचे ढीग, दगड विटांचे ढीग ठेवू नयेत.
* पावसाळ्यात रात्री पायात गमबूट घालावे.
* फॉरेस्ट या विषारी औषधांची बिळाशेजारी जागेत फवारणी करावी.
* उंदीर मारण्याचे औषध बिळात टाकावे; जेणेकरून साप येणार नाहीत.
सापांविषयी समाजात अनेक श्रद्धा-अंधश्रद्धा आहेत. सापांबद्दल मार्गदर्शन करून त्यांना अभय देण्याचे काम सर्पमित्र करतात. पेण परिसरात नाग, घोणस, मण्यार विषारी सर्प, तर धामण, डुरक्या घोणस, कवड्या, मांजऱ्या, तस्कर, गवत्या, काळडोक्या, हरणटोळ, कुकरी, रुखई, मांडोळ असे अनेक प्रकारचे बिनविषारी सर्प आढळून येतात. मात्र, साप दिसला की त्याला न मारता जीवदान दिले पाहिजे. साप हा उंदीर खातो. उंदीर शेतीमधले धान्य खातात. त्यांना साप खातो ही एक पूरक जीवनशैली आहे. यासाठी आता साप न मारता पकडून नेण्यासाठी नागरिकांचे फोन येतात.
- नितीन पाटीलः सर्पमित्र
Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00844 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..