
साथीचे आजार बळावण्याचा धोका
वडखळ, ता. ४ (बातमीदार) ः दरवर्षी पावसाळ्यात विषाणूजन्य साथीचे आजार बळावतात. हवामान बदलामुळे सध्या अनेकांना सर्दी, ताप, खोकल्याची लागण झाली आहे. साथीचा ताप तीन-चार दिवस राहतो. मात्र त्यानंतरही आराम न पडल्यास चाचण्या करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
दमट हवामानामुळे पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका बळावतो. पावसाळ्यात धरणातील पाण्याची पातळी वाढते, मात्र त्याचबरोबरच माती-गाळही वाढत असल्याने नदी, विहिरींसह नळावाटे येणारे पाणीही गढूळ होते. असे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात विषाणूजन्य आजार वाढतात.
ग्रामीण भागातील नागरिकांनी नदी-नाल्याचे पाणी थेट पिणे टाळावे. पिण्यासाठी मेडिक्लोर, टिसेल, टाकलेल्या विहिरीतून पाण्याचा वापर करावा. संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी पाणी उकळून, गाळून प्यावे. पावसाळ्यात पोटाचे विकार, अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ, टायफाईड, ताप सर्दी, खोकला अशा साथीच्या आजारांचे प्रमाण अधिक असते.
पायाला पडलेल्या भेगा किंवा जखम झालेल्या भागातून लेप्टो स्पायरोसिस विषाणूचा शिरकाव होऊ शकतो. त्यानंतर चार ते पाच दिवसांनंतर व्यक्तीला ताप येतो. याचा परिणाम फुप्फुस व किडनीवर होतो, त्यामुळे अशा रुग्णांवर वेळीच योग्य उपचार होणे आवश्यक आहे. लेप्टो स्पायरोसिसचे रुग्ण जुलै व ऑगस्टमध्ये वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ताप आल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
शेतात काम करताना प्लास्टिक बूट घालावेत. गेल्या आठवड्यापासून लेप्टो स्पायरोसिस हा विषाणूजन्य आजार वाढू नये, यासाठी प्रतिबंध उपाय म्हणून ‘कॅप डॉक्सी’ या गोळ्यांचे वाटप सुरू केले आहे. १८ वर्षांवरील नागरिकांना कोव्हिड बूस्टर डोस सुरू आहेतच. तरी आपण जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात जाऊन डोस घेणे तसेच पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. याबाबत शाळांमधूनही जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
- अपर्णा खेडेकर, आरोग्य अधिकारी, पेण
Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00857 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..