सलमानच्या वडिलांचा स्वच्छतागृहाला विरोध

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

वहिदा रहेमान यांचाही आक्षेप; शिवसेनाही विरोधात

वहिदा रहेमान यांचाही आक्षेप; शिवसेनाही विरोधात
मुंबई - स्वच्छ भारत अभियान आणि मुंबई महापालिकेचा स्वच्छतादूत असलेल्या सलमान खानचे वडील सलीम खान यांनीच महापालिकेच्या स्वच्छतागृहाला विरोध केला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांनीही त्यांची री ओढली आहे. त्यांच्या विरोधाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे, तर भाजपने स्वच्छतागृह योग्य असल्याची भूमिका घेतली आहे. त्यावरून आता राजकारण पेटण्याची शक्‍यता आहे.

वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड येथील सलमानच्या गॅलक्‍सी अपार्टमेंटला लागूनच महापालिकेतर्फे स्वच्छतागृह उभारण्यात येत आहे. या परिसरात स्वच्छतागृह नसल्याने तेथे येणाऱ्यांची गैरसोय होत होती. काही पर्यटक उघड्यावर लघुशंका करत होते. सलमानच्या हे निदर्शनास आल्यावर त्याने मोबाईल टॉयलेटची सोय करण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळेच पालिकेने त्याला मुंबईचा स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केले. त्याआधीपासून सलमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा दूत आहे; मात्र या स्वच्छ भारत अभियानालाच त्याच्या घरातून खो घातला जात असल्याचे उघड झाले आहे.

सलमानची इमारत आणि वहिदा रहेमान यांच्या बंगल्याला लागूनच पालिका स्वच्छतागृह बांधत आहे. त्याचे काम थांबवण्यासाठी सलीम, वहिदा रहेमान; तसेच इमारतींतील इतर रहिवाशांनी एच पश्‍चिम विभागाचे सहायक आयुक्त शरद उघाडे यांना पत्र पाठवले. त्यानंतर सलीम खान यांनी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनाही पत्र पाठवले आहे.

भाई का टॉयलेट - आशिष शेलार
महापौर महाडेश्‍वर यांनी सलीम खान यांच्या पत्राची तत्काळ दखल घेऊन सहायक आयुक्त उघाडे यांना पत्र पाठवले आणि स्वच्छतागृह अन्यत्र बांधण्याची सूचना केली आहे. कॉंग्रेसचे स्थानिक नगरसेवक आझिफ झकेरिया यांनीही स्वच्छतागृह बांधू नये, असे पत्र आयुक्त अजोय मेहता यांना पाठवले आहे. कॉंग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेही स्वच्छतागृह बांधण्यास विरोध केला आहे. भाजपने मात्र ते तेथेच बांधावे, अशी भूमिका घेतली आहे. हे स्वच्छतागृह सर्वांच्या सोईसाठी असून, गरज असल्यास त्याला "भाई का टॉयलेट' असे नाव देऊ, असा चिमटा भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि वांद्य्राचे आमदार आशिष शेलार यांनी काढत हे स्वच्छतागृह तेथेच बांधावे, अशी भूमिका मांडली आहे.

Web Title: toilet oppose by salman father