टोल दरवाढीमुळे खोपोलीत संताप!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग झाल्यापासून झटपट प्रवासाची व्यवस्था झाली असल्याने खासगी वाहनांसह अवजड वाहने या मार्गावरून टोलची रक्कम भरून प्रवास करीत असतात; मात्र सोमवारी (ता. २१) टोल दरात पुन्हा वाढ करण्यात आली.

खोपोली (बातमीदार) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग झाल्यापासून झटपट प्रवासाची व्यवस्था झाली असल्याने खासगी वाहनांसह अवजड वाहने या मार्गावरून टोलची रक्कम भरून प्रवास करीत असतात; मात्र सोमवारी (ता. २१) टोल दरात पुन्हा वाढ करण्यात आली. ही दरवाढ सर्व हलक्‍या वाहनांसाठी लागू आहे. दुसरीकडे अचानक टोल वसुलीत वाढ केल्याने या महामार्गावरील प्रवास महागल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांमधून उमटत आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील प्रवास महागला असून, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची निर्मिती झाल्यापासून देखभाल व टोलवसुलीचा ठेका आयआरबी कंपनीकडे होता; मात्र त्यांची मुदत संपल्याने मागील महिन्यात ग्लोबल ट्रान्स्पोर्ट अँड रोड सर्व्हिस या एजन्सीला आता टोल वसुलीचे काम देण्यात आले आहे. रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्राट्रक्‍चर कंपनी या मार्गाच्या देखभालीचे काम पाहत आहे. २१ ऑक्‍टोबरपासून ग्लोबल एजन्सीने या मार्गावरील टोलच्या रकमेत  वाढ केली आहे. वास्तविक यापूर्वी ऑगस्टमध्येही अशी टोल दरवाढ केली असताना आता पुन्हा हलक्‍या वाहनांसाठी पुन्हा टोल दरवाढ केली आहे.

आता १७३ रुपये मोजावे लागणार
तळेगाव-कुसगाव व खालापूर-कुसगावदरम्यान प्रवेश करणाऱ्या हलक्‍या वाहनांसाठी पूर्वी १३२ रुपये टोल आकारला जायचा. तो आता नवीन दरानुसार १७३ रुपये भरावा लागणार आहे. टेम्पो ट्रक व बस यांच्या दरातही वाढ केली आहे. दुसरीकडे रस्ते वाहतूक महामंडळानुसार ही दरवाढ राज्य सरकारकडून पारीत अध्यादेशानुसारच केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, थेट मुंबई-पुणे प्रवासाचे टोल दर मात्र पूर्वीप्रमाणेच कायम आहेत.

खालापूर ते कुसगाव या अंतरासाठी 
ऑगस्ट २०१८ पर्यंत : ९८ रुपये 
ऑगस्ट २०१८ पासून : १३२ रुपये
२१ ऑक्‍टोबर २०१९ पासून : १७३ रुपये 

खालापूर व कुसगावसाठीची ही टोलवाढ अन्यायकारक आहे. यातून जाणीवपूर्वक स्थानिक वाहनांना लक्ष करण्यात आले आहे. याला स्थानिकांकडून विरोध होईल.
- शशिकांत महाडिक, वाहनचालक, खोपोली

ही टोल दरवाढ राज्य सरकारचा अध्यादेश आणि रस्ते विकास महामंडळाच्या मंजूर निर्णयातून घेण्यात आला आहे. एक्‍स्प्रेस वेवरील मुंबई ते पुणे या थेट प्रवासासाठी कोणतीही टोलवाढ करण्यात आलेली नाही. फक्त खालापूर टोल प्लाझा व कुसगाव टोल प्लाझा दरम्यान एक्‍स्प्रेस वेवर येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी ही वाढ आहे.
- एस. बी. सोनटक्के, वाहतूक व टोल विभाग रस्ते विकास महामंडळ 

टोल दरवाढ स्थानिक वाहनधारकांना लक्ष करून केली आहे. ऑगस्ट महिन्यात अशाप्रकारे वाढ झाली असताना नव्याने १८ टक्के ही वाढ जाचक आहे. राज्य रस्ते विकास महामंडळकडून टोलवसुली नाही, तर टोलधाड सुरू आहे.
- अनिल मिंडे, मनसे शहराध्यक्ष, खोपोली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: toll increased in Khopoli