नगरसेवकांना हवी टोलमाफी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

मुंबई महापालिकेत ठराव, सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

मुंबई महापालिकेत ठराव, सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा
मुंबई - मानधनात पाचपट वाढ करा, अशी मागणी करणाऱ्या मुंबईतील 227 नगरसेवकांना आता टोलमाफीही हवी आहे. खासदार-आमदारांप्रमाणे सर्व टोलनाक्‍यांवर मुंबईच्या नगरसेवकांनाही विनामूल्य प्रवासाची मुभा द्यावी, असा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव राज्य सरकारकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात येणार आहे. नगरसेवकांना वरळी सी-लिंकवर टोलमाफी देण्यात येते.

अनेक नगरसेवकांना विविध उपक्रमांना भेटी देण्यासाठी तसेच त्यांची पाहणी करण्यासाठी शहराबाहेर जावे लागते. अशा वेळी मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक वगळता मुंबईबाहेरील सर्व टोलनाक्‍यांवर टोल भरावा लागतो. खासदार आणि आमदार यांना सर्व टोलनाक्‍यांवर टोलमाफी आहे. मुंबई पालिकेच्या नगरसेवकांनाही अशी सवलत द्यावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक तुकाराम पाटील यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. ही ठरावाची सूचना मंजूर करून महापालिका सभागृहात ठराव करण्यात आला आहे.

नगरसेवकांच्या सुविधा
लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट कनेक्‍शनसह सिमकार्ड, 10 हजार रुपये मासिक मानधन, बेस्ट बसचा मोफत पास, प्रत्येक सभेचा भत्ता, सर्व समिती अध्यक्षांना पालिकेची गाडी, कार्यालय व कर्मचारी, अभ्यास दौऱ्यांसाठी निधी.

Web Title: tollfree for corporator