तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

ठाणे-कल्याण, कुर्ला-वाशी आणि बोरिवली-नायगावदरम्यान बंद 

मुंबई - रूळ, ओव्हरहेड वायर व सिग्नल दुरुस्तीच्या कामांकरता रविवारी (ता.21) मध्य रेल्वेच्या ठाण्यापासून कल्याणपर्यंतच्या जलद मार्गावर आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी आणि पश्‍चिम रेल्वेवर बोरिवली ते नायगावदरम्यान दोन्ही दिशांच्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. या दिवशी अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द होतील. त्यामुळे वाहतूक उशिराने होईल. 

ठाणे ते कल्याण जलद मार्ग 

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ठाण्यापासून कल्याणपर्यंतच्या जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 पर्यंत वाहतूक बंद राहील. या कालावधीत सीएसटीहून सुटणाऱ्या जलद आणि अर्धजलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकात थांबतील. ठाण्यानंतर जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे सायंकाळी पाचपर्यंत लोकल 10 ते 15 मिनिटे उशिरा धावतील. 

कुर्ला-वाशी दोन्ही दिशांचे मार्ग 
हार्बरवरील कुर्ला ते वाशीदरम्यान दोन्ही दिशांच्या मार्गांवर सकाळी 11 ते सायंकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे सीएसटी ते वाशी, बेलापूर, पनवेलदरम्यान दोन्ही दिशांच्या मार्गांवरील लोकल रद्द केल्या जातील. सीएसटी ते कुर्ला व वाशी ते पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. 

बोरिवली ते नायगाव दोन्ही दिशांचे धीमे मार्ग 
पश्‍चिम रेल्वेवरील बोरिवली ते नायगाव दोन्ही दिशांच्या धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत जम्बोब्लॉक घेण्यात येईल. चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या सर्व गाड्या विरार, वसई ते बोरिवलीपर्यंत जलद मार्गावर आणि विरारच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या गोरेगाव ते वसई, विरार स्थानकापर्यंत जलद मार्गावर चालवण्यात येतील. 

Web Title: Tomorrow Megablocks on all three routes