उद्या मोरबे धरणावरचे जलपूजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता.९) सकाळी ९ वाजता महापालिकेच्या वतीने मोरबे धरणावर जलपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

नवी मुंबई ः मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता.९) सकाळी ९ वाजता महापालिकेच्या वतीने मोरबे धरणावर जलपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

निसर्गरम्य खालापूरच्या डोंगरकुशीत वसलेल्या मोरबे धरणातून नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणाची क्षमता ८८ मीटर इतकी आहे. यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणातील पाणीसाठ्याची पातळी ७० मीटरपेक्षा कमी होती. त्यातच जून महिना संपत आला तरी शहरात कोसळणाऱ्या पावसाने धरण क्षेत्रात हजेरी न लावल्याने पालिका प्रशासनाने पाण्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने दर मंगळवारी १० टक्के पाणीकपात सुरू केली होती.

मात्र, उसंत घेतलेल्या पावसाने २२ जुलैपासून या ठिकाणी जोरदार बॅटिंग सुरू केली. २२ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने आता मोरबे धरण तुडुंब भरले आहे. रविवार, ४ ऑगस्टपर्यंत ८८.५२ मीटरपर्यंत पाणीसाठा धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. धरणातील पाणीसाठा वाढल्यामुळे नवी मुंबईकरांचा पुढील वर्षभरासाठीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. हे जलपूजन शुक्रवारी (ता.९) पालिकेचे आयुक्त आबासाहेब मिसाळ, महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, पालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह लोकप्रतिनिधी, पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tomorrow Water worship On the Morbe Dam