#ToorScam स्वस्त तूरडाळ कोणी पळवली?

विजय गायकवाड
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

दृष्टिक्षेपात तूरडाळ
 राज्य सरकारकडून गेल्या वर्षी 
२५ लाख क्विंटल तुरीची खरेदी
 खरेदीचा भाव ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल
 सात लाख क्विंटल तुरीची भरडाई
 सार्वजनिक वितरण व्यवस्थेत 
३५ रुपये किलोने विक्री
 बाजारातील आजचा तुरीचा 
विक्री भाव- ७० रुपये प्रतिकिलो

मुंबई - किरकोळ दुकानांत तुम्ही एक किलो तूरडाळीसाठी किती रुपये मोजता? ७० रुपयांपेक्षा अधिक मोजत असाल, तर राज्य सरकारने ३५ रुपये किलो भावाने उपलब्ध केलेली स्वस्त-दर्जेदार तूरडाळ जाते कुठे; ती ग्राहकांपर्यंत पोचत का नाही? कारण, या डाळीला गोदामांतूनच पाय फुटतात. ही डाळ बाजारात येण्यापूर्वीच पाकिटे फोडून, ती खासगी दुकानदारांना विकणारी संघटित टोळी कोट्यवधी रुपये कमावत असते. राजरोस सुरू असलेला हा काळाबाजार ‘सकाळ’ने उघड केला आहे.

राज्यातील विक्रमी तूर उत्पादनानंतर तूर खरेदी आणि भरडाईपासून सुरू झालेली गैरव्यवहारांची मालिका आता तूर विक्रीपर्यंत पोचली आहे. ३५ रुपये किलोने विक्री अपेक्षित असलेली शासकीय तूर पिशव्या फाडून खुल्या भावाने विकली जात असल्याचा संशय आहे. शासकीय तुरीच्या रिकाम्या पिशव्यांचा ढीगच नवी मुंबईत सापडला आहे. यामागे तूरडाळीचे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे पणन विभागातील अतिवरिष्ठ सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गतवर्षी अतिरिक्त तूर उत्पादन आणि बाजारभाव कमी असल्याने तूरडाळ खरेदी करून शासकीय विभागांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य शासनामार्फत बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत तुरीची भरडाई केल्यानंतर डाळीची विक्री राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून करण्याबाबतचा निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात आला होता. तूरडाळीची विक्री सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य दुकानदारांमार्फत वितरीत करण्याच्या सूचना ३० नोव्हेंबर २०१७ च्या शासन परिपत्रकानुसार देण्यात आल्या होत्या. तूरडाळीची विक्री अधिक व्हावी, या उद्देशाने स्वस्त धान्य दुकानदारांकडून सर्वप्रथम ५५ रुपये किलोप्रमाणे तूरडाळ विक्री करण्यात आली; मात्र एक महिन्यापूर्वी १४ जून २०१८ ला तूरडाळ विक्रीसंदर्भात शासनाने नवीन निर्णय जारी करीत ३५ रुपयांत तूरडाळ विक्रीस आणली.

मागील काळात राज्यातील आंदोलने आणि संपाच्या पार्श्‍वभूमीवर तुरीचा तुटवडा निर्माण झाला होता. बाजारातील सरासरी तूरडाळीचा भाव प्रतिकिलो ७० रुपयांपर्यंत पोचला आहे. याच भाववाढीचा फायदा घेण्यासाठी शासनाने कंत्राट दिलेले मिलर्स आणि पुरवठादारांनी संगनमताने शासकीय तूरडाळीची एक किलोची पाकिटे रिकामी करून बाजारभावाने विकल्याचा संशय आहे.

दृष्टिक्षेपात तूरडाळ
 राज्य सरकारकडून गेल्या वर्षी 
२५ लाख क्विंटल तुरीची खरेदी
 खरेदीचा भाव ५ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल
 सात लाख क्विंटल तुरीची भरडाई
 सार्वजनिक वितरण व्यवस्थेत 
३५ रुपये किलोने विक्री
 बाजारातील आजचा तुरीचा 
विक्री भाव- ७० रुपये प्रतिकिलो

कस्टमर केअरचा नंबर बोगस 
सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने महाराष्ट्र स्टेट ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या नावाने छापलेल्या तूरडाळीच्या एक किलोच्या पाकिटावर ०२२-२३७५२२९१ हा कस्टमर केअर क्रमांक देण्यात आला आहे. शहानिशा करण्यासाठी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने त्या क्रमांकावर फोन केला असता तो हिंदी भाषक व्यक्तीने उचलला.  हे राज्य सरकारचे तूरडाळीचे गोदाम आहे का, अशी विचारणा केली असता त्याने ही शाळा असल्याचे सांगत फोन ठेवून दिला. पुन्हा त्या क्रमांकावर फोन करून शाळेचे नाव व ठिकाण विचारले असता, पलीकडील व्यक्तीने फोन ठेवून दिला. छापलेल्या पाकिटावर तूरडाळ प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग करणाऱ्या कंपनीचा पत्ता आहे. पुरवठादार म्हणूनही त्याच कंपनीचे नाव आणि पत्ता छापण्यात आला आहे.

अतिरिक्त तुरीची डाळ करून स्वस्त भावात विक्रीचे शासनाचे धोरण आहे. याबाबत अनियमितता होईल अशी शंका होती. म्हणूनच शासकीय लोगोसह पिशवीतून तूर विक्रीचे निर्देश दिले होते. याबाबत मिलर्सच्या पातळीवर आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील दोषींची सखोल चौकशी केली जाईल. याबाबत सर्वप्रथम पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोषींवर निश्‍चितपणे कारवाई करण्यात येईल.
- बिजयकुमार, अतिरिक्त मुख्य सचिव, कृषी व पणन विभाग

Web Title: #ToorScam Maharashtra government toor dal scam sakal exclusive