दिवाळी हंगामात पर्यटनाचा दिवाळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांनी बहरणारे समुद्र किनारे या हंगामात अद्याप ओस पडले आहेत. सतत पडणारा पाऊस, वादळी हवामान, बंद असलेली जलवाहतूक सेवा, आर्थिक मंदी अशा अनेक कारणांमुळे रायगडमधील पर्यटनात ५० टक्के घट झाली आहे.

अलिबाग : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांनी बहरणारे समुद्र किनारे या हंगामात अद्याप ओस पडले आहेत. सतत पडणारा पाऊस, वादळी हवामान, बंद असलेली जलवाहतूक सेवा, आर्थिक मंदी अशा अनेक कारणांमुळे रायगडमधील पर्यटनात ५० टक्के घट झाली आहे. यामुळे माथेरान बाजारपेठ, अलिबाग, काशिद, दिवेआगर, किहिम समुद्रकिनाऱ्यांवर शुकशुकाट आहे.

रायगडमध्ये पर्यटन हा मुख्य व्यवसाय असल्याने येथील अर्थकारणही या व्यवसायावर अवलंबून आहे. या व्यवसायात साधारण ५० टक्के घट झाल्याने पर्यटनावर अवलंबून असणाऱ्यांचा दिवाळा निघाला आहे. कामगारांना दोन महिन्यांचा पगार न मिळाल्याने अलिबाग येथील हॉटेल बिगस्प्लॅशच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी दुपारी अचानक संप पुकारला. अशीच परिस्थिती अन्य हॉटेल व्यवस्थापकांची आहे. धंदा नसल्याने मोठ्या आर्थिक संकटात येथील व्यावसायिक सापडले आहेत. दिवाळीची सुट्टी पडल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा राबता सुरू होतो. फणसाड वन्यजीव अभयारण्य, कर्नाळा पक्षी अभयारण्य, किल्ले रायगड, जंजिरा किल्ला, कुलाबा किल्ला पाहण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार येणाऱ्या पर्यटकांची संख्या मागील काही वर्षांत वाढत होती. मात्र, यावर्षी आर्थिक मंदीसह बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचे हॉटेल सन्मान हॉलीडे होमचे व्यवस्थापक रोहीत आंबेतकर यांचे म्हणणे आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर शुकशुकाट दिसून येत आहे. 

माथेरानची मिनी ट्रेन सुरू नसल्याने साधारण अडीच किलोमीटरचा प्रवास कुटुंबासह पर्यटक करण्यास तयार नाहीत. समुद्र अद्याप शांत झालेला नसल्याने जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या नौका सुरू झालेल्या नाहीत. तसेच, किल्ले रायगडवर येणाऱ्या इतिहासप्रेमी पर्यटकांमध्येही वाढ झालेली नाही. मागील वर्षी पावसाने वेळेत माघार घेतली होती. त्यामुळे वेळेत पर्यटन हंगाम सुरू झाला होता; मात्र यावर्षी वादळसदृश्‍य स्थिती असल्याने अनेकांनी रायगडमध्ये पर्यटनासाठी न येण्याचा निर्णय घेतला असावा, असे म्हणणे मोरे कॉटेजचे मालक हर्षल मोरे यांचे आहे.

दिवाळीसाठी पूर्वी एक महिना आधीच निवास व्यवस्थेसाठी बुकिंग होत असे. यावर्षी अद्याप बुकिंगला सुरुवात झालेली नाही. खूपच अल्पप्रतिसाद मिळत आहे. यामुळे या वेळी केलेली गुंतवणूक कशी सोडवायची? हा मोठा प्रश्न  पडला आहे. 
- वैभव सुर्वे, श्रीकृपा लॉज, रेवदंडा

दरवर्षी येथे लाखो पर्यटक भेट देतात. त्यामुळे पर्यटन बहरलेले असते; पण या वेळी माथेरानमध्ये पर्यटक संख्या रोडवली आहे. यावर्षी दिवाळी हंगामात ५० टक्के फरक पडलेला आहे. यामागे मिनी ट्रेन बंद, आर्थिक मंदी कारणीभूत 
असू शकते.
- राजेश चौधरी, अध्यक्ष व्यापारी फेडरेशन, माथेरान

पर्यटन व्यवसायातील मंदीचे कारणे
     आर्थिक मंदी
     वादळसदृश्‍य स्थिती
     सुरू न झालेली जलवाहतूक सेवा
     पावसामुळे आजारपणाची भीती
     खराब झालेले रस्ते
     नागरिकांची खर्च न करण्याची मानसिकता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourism not good condition in Diwali vacation