ठाणे शहरात खारफुटीतून लुटा पर्यटन आनंद 

संग्रहित
संग्रहित

ठाणे : ठाणे शहराला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला आहे. ठाणे-वसई-कल्याण या जलवाहतुकीला चालना दिल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील नागरिकांना पर्यटनाची द्वारे खुली करण्यासाठी "खारफुटी सफारी'चा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या खाडीकिनारी खारफुटी सफारी महापालिकेकडून सुरू केली जाणार आहे. यानिमित्ताने ठाण्याप्रमाणेच लगत असलेल्या इतर शहरांतील नागरिकांनाही पर्यटनाची एक वेगळी संधी उपलब्ध होणार आहे. 

"ईवाय' या सल्लागार संस्थेसोबत याबाबत आज झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा निर्णय घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, ईवायचे वरिष्ठ प्रबंधक रुचिर राज यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बोलताना जयस्वाल यांनी ठाणे शहराला लाभलेल्या खाडी किनारी "मॅंग्रोज ट्रेलर्स' सुरू करून पर्यटनाला चालना देण्यासाठी उद्यान विभागाने अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. 

ठाणे महापालिकेने तयार केलेल्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाच्या ठाणे-वसई-कल्याण डीपीआरला 645 कोटींची मान्यता मिळाली असून त्याच्या नियोजनाचे काम सुरू झाले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील सुरू झालेल्या वसई ते ठाणे-कल्याण जलमार्ग क्रमांक 53 या 50 किलोमीटरच्या मार्गावर एका ठिकाणी मल्टी मॉडेल हब व विविध ठिकाणी दहा जेट्टी असून त्यापैकी 4 जेट्टींची कामे प्रस्तावित केली आहेत. त्यासाठी जेएनपीटीमार्फत कार्यवाही सुरू आहे. अशा प्रकारे जलवाहतुकीसाठी महापालिकेने एक पाऊल यापूर्वीच पुढे टाकले आहे. 

खाडी परिसराचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी आणि केवळ विरंगुळा मिळावा, यासाठी नागरिकांना खाडीची सफर घडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी उद्यान विभागाला केल्या आहेत. त्यातही कांदळवनात अनेक पक्षी तसेच प्राणी बघण्याची संधी मिळते; पण ही संधी प्रत्यक्ष मिळाल्यास त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता आहे. यामुळे खाडीच्या पर्यावरणाबाबत नागरिकही अधिक सजग होणार असून जलवाहतुकीच्या मार्गावरून आता पर्यटनाचा आनंद नागरिकांना लुटता येणार आहे. 

ठाण्यातील जलवाहतुकीला चालना 
ठाणे शहराला मोठ्या प्रमाणात खाडीकिनारा लाभलेला आहे. तसेच या शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या जटिल झाली आहे. अशा वेळी वाहतूक कोंडी आणि प्रदूषण टाळण्यासाठी पाच महापालिकांना जोडणारा जलवाहतुकीचा प्रस्ताव पुढे आला होता. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पाला चालना मिळावी, यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केले होते. प्राथमिक अहवाल तयार करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्याच्याच आधारावर ठाण्याचे खासदार राजन विचारे व कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या प्रस्तावाचे ठाणे महापालिकेच्या वतीने सादरीकरण केले. या सादरणीकरणानंतर या प्रस्तावाला 24 ऑक्‍टोबर 2018 ला मंजुरी मिळाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com