अडकलेल्या पर्यटकांची मोबाईलमुळे सुटका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

कर्जत येथील ढाक गुहांकडे निघालेले पर्यटक वाट चुकल्याने एका डोंगर कड्यावर अडकून पडले.

रोहा (बातमीदार) : कर्जत येथील ढाक गुहांकडे निघालेले पर्यटक वाट चुकल्याने एका डोंगर कड्यावर अडकून पडले. सुदैवाने त्यांचा मोबाईल सुरू व रेंजमध्ये असल्याने त्यांना वेळेत मदत मिळाली. कर्जतच्या गिर्यारोहकांनी त्या पर्यटकांची सुखरूप सुटका केली.

कल्याणहून अपरूप हाजरा, शिराज मेनन कार्तिक वाईर, वरून छड्डा हे पाच पर्यटक मंगळवारी (ता. १२) कर्जतच्या ढाक बहिरीगुहा पाहण्यासाठी कर्जतच्या सांडशी गावात आले. सकाळी ७ वाजता त्यांनी सांडशी गावातून ढाकच्या चढाईला पायवाटेने  सुरुवात केली. बरेचसे अंतर हे तरुण चढून गेले; मात्र अनुभव नसल्याने व गाईड सोबत नसल्याने ते रस्ता चुकले व गुहेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. परिस्थिती बघून त्यांनी परत फिरायचा निर्णय घेतला; परंतु परतीच्या वाटेवर दाट जंगलामुळे वाट चुकून ते एका अवघड व २५० फूट उभ्या  कड्यावर अडकून बसले. त्यांच्याकडे काही रेस्क्‍यू संपर्क असल्याने त्यांनी पुण्याच्या ओंकार ओक यांना फोन केला. ओक यांनी त्यांचे गुगल लोकेशन मागवले. त्यावरून कळले की ते गावापासून फार लांब नाहीत; पण एका अवघड कड्यावर अडकल्याने त्यांना खाली उतरता येणार नाही. 

ओक यांनी त्यांचे गुगल लोकेशन व त्या मुलांचे जादाचे कॉन्टॅक्‍ट नंबर खोपोलीच्या ‘यशवंती हायकर्स’ संस्थेच्या पद्माकर गायकवाड यांना पाठवले व रेस्क्‍यू टीम पाठवण्याची विनंती केली. 

गायकवाड यांनी त्वरित कर्जत येथील संतोष दगडे यांना संपर्क करून मुलांच्या मदतीला जाण्यास सांगितले. ४ वाजता संतोष हे सुशांत करंदीकर निघाले व एका अवघड वाटेने रॅपलिंग करून त्या अडकलेल्या मुलांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. त्यांनी सोबत पाणी, बिस्किटे व प्रथमोपचार पेटीसोबत नेली होती. दुपारी ४ वाजता सुरू झालेले ऑपरेशन रात्री ८ वाजता पर्यटकांना सुखरूप सांडशी गावात पोहोचवून संपले.

स्थानिक वाटाड्या सोबत न घेतल्याने व वाट माहीत नसल्याने वाट चुकले. संध्याकाळी ८ वाजता पर्यटकांना सांडशी गावातून सुखरूप परत पाठवले.
- सुशांत करंदीकर, गिर्यारोहक कर्जत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourist news