टुरिस्ट टॅक्‍सी परवाना न देण्याचा निर्णय रद्द

प्रशांत कांबळे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

परिवहन विभागाने 1400 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या आणि 375 लिटरपेक्षा लहान डिकी असलेल्या वाहनांना पर्यटन टॅक्‍सी परवाना न देण्याचे निर्देश 1 एप्रिलला दिले होते. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी हा निर्णय 15 दिवसांत मागे घेतला आहे.

मुंबई - परिवहन विभागाने 1400 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या आणि 375 लिटरपेक्षा लहान डिकी असलेल्या वाहनांना पर्यटन टॅक्‍सी परवाना न देण्याचे निर्देश 1 एप्रिलला दिले होते. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी हा निर्णय 15 दिवसांत मागे घेतला आहे.

प्रत्येक आरटीओ विभागात सर्व वाहनांना टुरिस्ट टॅक्‍सी परवाना दिला जात होता. परंतु, 1 एप्रिलपासून परिवहन आयुक्तांनी कमी क्षमतेच्या वाहनांना पर्यटन टॅक्‍सी परवाना देऊ नका, असे तोंडी निर्देश दिले होते. त्यामुळे राज्यातील परिवहन कार्यालयांत संभ्रम निर्माण झाल्याने या काळात एकाही लहान वाहनाला परवाना देण्यात आला नाही. त्यामुळे वाहनाचे मालक त्रस्त झाले होते. यामुळे वाहननिर्मिती कंपन्यांनाही फटका बसण्याची शक्‍यता होती. लेखी आदेश न देता फक्त मोबाईलवर लघुसंदेश पाठविल्याबद्दल अधिकारीही आश्‍चर्य व्यक्त करीत होते. त्यामुळे गोंधळ उडून तक्रारी येऊ लागल्यावर सोमवारी हा आदेश रद्द करण्यात आला.

प्रतिक्रिया
परिवहन आयुक्तांनी तोंडी आदेश देणे अभिप्रेत नाही. अशा आदेशांना राज्य सरकारची मान्यता हवी. यासंदर्भात राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे.
- सचिन अहिर, अध्यक्ष, चालक-मालक संघटना

सर्व वाहनांना टुरिस्ट टॅक्‍सी परवाने देणे सुरू आहे. वाहनांच्या विम्याबाबत काही वाद होता. त्यासंदर्भात आम्ही परिपत्रक काढले आहे.
- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त

Web Title: Tourist Taxi Permission Decision Cancel Mumbai RTO