कांदा दरवाढीमुळे व्यापारीच मालामाल!

कांदा दरवाढीमुळे व्यापारीच मालामाल!



नवी मुंबई : सध्या कांदा दरवाढीने या वर्षातील उच्चांकी पातळी गाठली आहे. या आठवड्यात राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये कांदा सरासरी ११० ते १३० रुपये प्रतिकिलोपर्यंत वधारला. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी खुशीत असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे; मात्र या दरवाढीचा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच सर्वाधिक फायदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या वर्षीच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात कांद्याचे दर निचांकी पातळीवर होते. कांद्याची ही घसरगुंडी या वर्षीच्या जुलै महिन्यापर्यंत सुरूच होती. अर्थात डिसेंबर ते जुलै या कालावधीत शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध असतो; मात्र ऐन काढणीच्या कालावधीत दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कांदा रस्त्यावर ओतून देण्याची वेळ आली होती. कोसळलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळणेही मुश्‍किल झाले होते; तर या वर्षीदेखील अवकाळी पावसाने बहुतांश शेतकऱ्यांचे कांदा पीक पावसाने खराब झाल्याने माल खूपच कमी निघत आहे; तर ज्या शेतकऱ्यांनी चाळींमध्ये कांदा साठवून ठेवला होता, त्यांनी दर घसरणीच्या भीतीने तो यापूर्वीच विक्री केला.

त्यामुळे सध्या जो काही कांद्याचा साठा उपलब्ध आहे. तो बहुतांशी व्यापाऱ्यांकडे आहे. परिणामी, दरवाढीच्या लॉटरीत केवळ व्यापारी मालामाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिक, नगर, पुणे या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांतून मुंबई बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांदा दाखल होतो; मात्र सद्यस्थितीत या क्षेत्रातील शेतकऱ्यांकडे कांदाच शिल्लक नसल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवडचे कांदा उत्पादक शेतकरी भाऊसाहेब सवंद्रे यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्याच्या शेवटी कांदा लागवड केली आहे; मात्र अवकाळी पावसाने या लागवडीस मोठा फटका बसला. जो काही कांदा शिल्लक आहे, तो जानेवारीच्या मध्यावधीत काढणीस येईल.

याशिवाय पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे कांदा उत्पादक शेतकरी राहुल महाबरे यांनी सांगितले, सध्या कांदा लागवड सुरू असून, काही लागवड ही सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस केली आहे. लागवड केलेला हा कांदा फेब्रुवारी महिन्यात काढणीस येईल. चाळींमध्ये साठवून ठेवलेला कांदा यापूर्वीच १० रुपये प्रतिकिलोच्या अल्पदरात विक्री केला. तालुक्‍यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे सध्या कांदा शिल्लक नाही.

व्यापाऱ्यांची दिवाळी 
शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेपोटी  बेभाव कांदा विकल्यानंतर व्यापाऱ्यांनी 
या कांद्याची साठवणूक करून ठेवली आहे. आता दर वधारल्याने या भाववाढीचा फायदा व्यापाऱ्यांना अधिक होत आहे. सरासरी हजार रुपये दराने खरेदी केलेल्या कांद्याला सध्या तिप्पट नफा मिळत असल्याने व्यापाऱ्यांची दिवाळी झाली आहे.

या वर्षी चाळीमध्ये कांदा साठवून ठेवला होता; मात्र दर घसरणीच्या भीतीने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बाजारात सर्व माल विक्री केला. त्यामुळे दरवाढ झाली असली, तरी त्याचा काहीही फायदा नाही.
- मिलिंद जाधव, कांदा उत्पादक शेतकरी, सटाणा (नाशिक)

नवीन कांदा बाजारात दाखल झाला असला, तरी त्याचे प्रमाण फारच कमी आहे. मागील वर्षी झालेल्या दर घसरणीमुळे, या वर्षी शेतकऱ्यांनी साठवलेला सर्व कांदा ऑगस्ट महिन्यातच विक्री केला. त्यातच अवकाळी पावसाने या वर्षीचे पीक खराब झाल्याने शेतकऱ्यांकडे सध्या कांदा उपलब्ध नाही. मुंबई बाजारात दाखल होणारा कांदा हा तो बहुतांशी व्यापाऱ्यांकडील असतो.
- जयदत्त होळकर, सभापती, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.


वाशी बाजार समितीतील महिनानिहाय दर 
महिना    सरासरी कांदा दर (प्रतिक्विंटलमध्ये)
१ ते ६ डिसेंबर           ९५०० ते १३,०००
१५ ते ३० नोव्हेंबर        ५५०० ते ८०००
१ ते १५ नोव्हेंबर         ४३०० ते ५५०० 
ऑक्‍टोबर                   ३८०० ते ४४००
सप्टेंबर                      २५०० ते ३६००
ऑगस्ट                     १६०० ते २७००
जुलै                          १६०० ते १७००
जून                           १२०० ते १५०० 
मे                             १००० ते १३०० 
एप्रिल                         ८५० ते ११००
मार्च                              ६०० ते ८५० 
फेब्रुवारी                          ७०० ते ८००
जानेवारी                         ८५० ते ९००
(स्रोत : ॲगमार्कनेट, भारत सरकार)

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com