ऑनलाइन खरेदीच्या विरोधात उल्हासनगरातील व्यापाऱ्यांनी घेतली शपथ

ulhasnagar
ulhasnagar

उल्हासनगर : ऑनलाइन कंपन्यांनी जाळे पसरल्याने ऐन दिवाळीत उल्हासनगरातील बाजारपेठात दरवर्षीची गर्दी ओस पडताना दिसत आहे. या प्रकाराने एकवटलेल्या व्यापाऱ्यांनी ऑनलाइन कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी बुकिंग करताना कॅश ऑन डिलिव्हरी हा विकल्प स्विकारत, वस्तूची डिलिव्हरी दरवाज्यात आल्यावर पैसे नसल्याचे कारण देत स्विकारू नका, अशी चाणक्य निती अवलंबण्याचे आवाहन उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या व्यापाऱ्यांनी केले आहे. 

उल्हासनगर शहरात 25 हजार व्यापारी आहेत. विविध वस्तू विक्री करणारे 48 बाजार आहेत. हे 48 बाजार उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या अंतर्गत येतात. या सर्व व्यापाऱ्यांची अरबो रुपयांची उलाढाल होते. मात्र यंदा दिवाळी सणात बाजार थंड आहे. दिवाळी सणानिमित्त होणारी खरेदीची लगबग दिसेनाशी झाली आहे. उल्हासनगर शहरातील व्यापार आणि उद्योगधंद्यांना उतरती कळा लागण्यामागे होणारी ऑनलाईन खरेदी असल्याने व्यापार हताश झाले आहेत. त्यावर तोडगा उल्हासनगर ट्रेड असोसिएशन या संघटनेने मंगळवारी दुपारी कॅम्प ३ येथील रिजेन्सी हॉल येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महापौर पंचम कलानी, यूथ आयकॉन ओमी कलानी, युटीएचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष पितु राजवानी, अजित माखीजानी,पप्पू बेहरानी, दिपक छतलानी, राम तनवाणी, दिनेश लेहरानी, कमलेश निकम, इलेकट्रोनिक आणि मोबाईल असोसिएशनचे व्यापारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, दिवा आदी भागातील व्यापारी संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते.

दिपक छतलानी यांनी ऑनलाईन व्यापारामुळे करोडो रुपयांची गुंतवणूक दुकान आणि वस्तूंमध्ये करून बसलेले व्यापारी देशोधडीला लागले असल्याचे सांगितले. यासाठी मागील आठवड्याभरापासून या व्यापाऱ्यांनी बड्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीचे महागडे टिव्ही, फ्रिजची ऑनलाईन मागणी बड्या कंपनीच्या अॅपवर करण्यास सुरुवात केली आहे. हि मागणी करताना कॅश ऑन डिलिव्हरी हा विकल्प स्विकारला जातो. ज्यावेळी हि महागडी वस्तू कुरिअर मार्फत घरी आल्यावर आज पैसे नाहीत. उद्या या असे सांगून परत पाठवली जाते. पुन्हा दुसऱ्या दिवशी वस्तू आल्यावर असाच प्रकार केला जातो. यामुळे वस्तूच्या वाहतुकीत मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने अखेर कंपनीचे ऑर्डर रद्द करते. असा प्रकार झाल्यामुळे अॅमेझॉन ह्या कंपनीने कॅश व डिलिव्हरी हा विकल्प उल्हासनगरचा 421003 हा पिनकोड बंद केल्याचे छतलानी यांनी सांगितले. हा मोठा विजय असून हीच नीती वापरून धडा शिकवा असे आवाहन छतलानी यांनी केले.

ऑनलाईन व्यापाराचा निषेध करताना उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांच्या वस्तूंची ऑनलाईन विक्री करण्यासाठी वेब पोर्टल आणणार असल्याचे ओमी कलानी यांनी सांगितले. पंधरा दिवसांपूर्वी भाजपचे ब्लॉक अध्यक्ष बच्चन तोमर यांनी महापौर पंचम कलानी यांची मोतीचूरच्या लाडूनी तुला केली होती. आजच्या बैठकीनंतर व्यापारी संघटनेने महापौर कलानी यांची 10 रुपयांच्या चिल्लरने तुला करायची इच्छा व्यक्त केली. हे पैसे वृद्धाश्रमाला देणार असल्याचे व्यापारी नरेश थारवानी यांनी सांगितले. तुला करण्यासाठी वजन काट्यापासून सर्व सोय करण्यात आली होती. मात्र व्यापारी हे आर्थिक अडचणीत असताना अश्या प्रकारची तुला करणे योग्य नसल्याचे सांगत तुला करण्यास नकार दिला. मात्र ते पैसे वृध्दाश्रमाला द्या, असे यावेळी महापौर पंचम कलानी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com