Traffic jam problem in Mumbai hour for ten minute travel mumbai traffic police
Traffic jam problem in Mumbai hour for ten minute travel mumbai traffic police sakal

Mumbai Traffic Jam : असा होतो वेळ खर्च; दहा मिनिटांच्या अंतरासाठी सव्वा तास

घराबाहेर पडल्यावर नियोजित ठिकाणी किती वेळेत पोहोचू याचा नेमका अंदाजही येत नाही

मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. घराबाहेर पडल्यावर नियोजित ठिकाणी किती वेळेत पोहोचू याचा नेमका अंदाजही येत नाही. एखाद्या रस्त्यावर तर दहा मिनिटांच्या अंतरासाठी सव्वा तास खर्च होत आहे. या स्थितीचा आँखो देखा हाल ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी थेट वाहतूक कोंडी होणाऱ्या प्रमुख मार्गांवर प्रवास करून मांडला आहे. या टेस्ट ड्राईव्हचे हे निष्कर्ष...

किंग्ज सर्कल (सायन) ते जे. जे. सिग्नल (भायखळा)

मुंबईतील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महामार्गापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हा एक होय. दक्षिण मुंबईत जाण्यासाठी वाहनांना हा मार्ग अतिशय मोक्याचा ठरतो. या मार्गात सायन, किंग्स सर्कल, माटुंगा, दादर, हिंदमाता, परळ, लालबाग, भायखळा, नागपाडा ही मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे येतात. या महामार्गावर किंग्ज सर्कल ते जेजे हॉस्पिटल हे दहा किलोमीटर हे अंतर बेस्टमार्गे पार करण्यासाठी सामान्य वेळेस २० मिनिटांचा कालावधी लागतो; परंतु सकाळी पीक अवर्समध्ये हेच अंतर कापण्यासाठी ४९ मिनिटे एवढा वेळ लागतो. दादर टीटी असो किंवा भायखळा, नागपाडा सिग्नल या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. रस्त्याच्या बाजूला काही ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीस भरीस भर पडते. दादर, भायखळा राणी बागचा परिसर, लालबाग मार्केटच्या परिसरात ही समस्या पाहायला मिळते.

टाईमलाईन

९.३८ गांधी मार्केट (किंग्स सर्कल)

९.४४ महेश्वरी उद्यान

९.५१ दादर टीटी

९.५४ हिंदमाता

१०.०३ परळ

१०.०९ लालबाग

१०.१४ चिंचपोकळी

१०.१७ जिजामाता उद्यान, राणीबाग

१०.२१ एएच अन्सारी चौकी

१०.२७ जेजे सिग्नल (नागपाडा)

कारणे

  • वाहनचालकांच्या खास करून दुचाकी वाहनांकडून लेन कटिंगसारखे प्रकार

  • काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली वाहने

  • दक्षिण मुंबईत बाजारपेठांकडे येणाऱ्या वाहनांची मोठी संख्या

सांताक्रूझ - मिलन सबवे - बीकेसी

सांताक्रूझमधील मराठा कॉलनी ते मिलन सबवे हे अंतर जवळपास २ किलोमीटरचे आहे. रस्ता खुला असल्यास हे अंतर पार करण्यास पाच ते सहा मिनिटे लागतात. यादरम्यान एका मिनिटांचा सिग्नल लागतो; मात्र सकाळी ९.३० वाजताच्या पिक अवर्समध्ये बाईकवर प्रवास सुरू केला असता या प्रवासासाठी २० मिनिटे लागली. विले-पार्ले ते अंधेरीदरम्यान लागणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील सहारा स्टार हॉटेलपासून ते सांताक्रूझ फ्लायओव्हरला जाण्यासाठी सर्व्हिस रोडने गेल्यास तीन मिनिटे ऐरवी लागतात; पण सकाळच्या वेळेत हा रस्ता पार करण्यासाठी १० मिनिटे लागले. या रस्त्यावर एअरपोर्टवरून येणाऱ्या गाड्या, अरुंद रस्ते आणि सर्वांत महत्त्वाचे इथे मेट्रोच्या कामासाठी रस्त्याच्या बाजूलाच पत्रे टाकून ठेवले आहेत.

टाईमलाईन

९.३० मराठा कॉलनी (सांताक्रूझ)

९.५० मिलन सबवे

१०.०० सर्व्हिस रोड

१०.११ खेरवाडी बस स्टॉप

१०.३० बीकेसी अॅव्हेन्यू स्ट्रीट

कोंडीची कारणे :

  • वाहतुकीचे दोन मिनिटांचे सिग्नल

  • ओशिवरा नदीवरील पुलाचे काम सुरू असणे

  • रस्त्यालगतच्या मोठ्या वाहनांचे पार्किंग

  • गोरेगावच्या हद्दीतून जाणाऱ्या स्वामी विवेकानंद मार्गावर वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतूक कोंडी होते आणि वाहतुकीचा वेगही मंदावतो. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाढून जास्त इंधन व पैसे खर्च होतात. एरवी हा जेमतेम दोन किमीचा टप्पा गाठण्यास सात-आठ मिनिटे पुरतात; पण कोंडी झाल्यावर किती वेळ लागेल, हे निश्चित नसते.

  • पश्चिम द्रुतगती महामार्गावरून लिंक रोडवर जाण्यासाठी स्वा. सावरकर उड्डाणपूल झाला, तरीही त्याखालील वाहतूक कोंडी कमी झाली नाही. येथील काही सिग्नल तर दोन मिनिटांचे असल्याने शेजारच्या वाहनचालकांची चांगलीच रखडपट्टी होते. येथून पाटकर महाविद्यालयापर्यंतचा प्रवास वेगात होतो; पण पुढे उजवीकडील गल्ल्यांमधून एस. व्ही. रोडवर येणाऱ्या वाहनांमुळे वेग मंदावतो. अनावश्यक तेथील गल्ल्यांमधून मुख्य

  • रस्त्यावर येणारे राईट टर्न बंद करणे हा त्यावर उपाय ठरू शकतो. त्यानंतर आरे रोड सिग्नलपर्यंत हळूहळू जावे लागते. पुढे फिल्मिस्तान स्टुडिओपाशी गेली किमान शंभर वर्षे अरुंद असलेल्या या रस्त्यामुळे येथे वाहतूक कासवाच्या पावलांनी पुढे जाते. या समस्येवर कोणालाही उपाय शोधणे जमले नाही.

  • रत्ना सिग्नलही किमान एक-दीड मिनिटांचा असल्याने येथेही हल्ली रखडपट्टी होते. त्यापुढेही योगीराज व सम्राट नाक्यावर छोटे सिग्नल आहेत. या टप्प्यात अनेक वाहने, स्कूलबस रस्त्याच्या कडेला उभे असल्याने हा तीनपदरी रस्ता आपोआपच दोन पदरी होतो आणि वाहतुकीचा वेग मंदावतो. येथे रिक्षा जेमतेम ताशी २० किमी वेगानेच जाते. त्यातच दोन्ही बाजूंनी एसव्ही रोडवर येणाऱ्या वाहनांमुळेही इतरांना थांबावेच लागते. आता यावर उपाय म्हणजे एसव्ही रोडवर लांब उड्डाणपूल उभारणे हाच एक मार्ग आहे.

  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या मार्गावर पूल रुंदीकरणाची वा दुरुस्तीची कामे सुरू असली, की या सिग्नलवर पाच मिनिटे रखडावे लागते. तेथून पुढे ओशिवराच्या दिशेने निघाल्यावर उड्डाणपुलाच्या खांबांचे काम सुरू असल्याने तेथे रस्त्यावर वाहने पार्क केली असली, तर हमखास पाच मिनिटे तरी अडकून बसावे लागते. ओशिवरा नदीवरील पुलाचेही काम सुरू असल्याने त्यापुढील सिग्नलवरही पाच मिनिटांची निश्चिती असते. वाहतूक अडून राहू नये, म्हणून पोलिसांनी विशेष काळजी घेतली पाहिजे, असेही वाहनचालक सांगतात.

जिथे काम सुरू असते, तेथे हमखास वाहतूक कोंडी होते. काम करणाऱ्यांनी याबाबत काळजी घेतली पाहिजे.

- हरी चौरसिया, रिक्षाचालक

रस्ते तेवढेच राहिले आणि वाहनांची संख्याच वाढल्याने वाहतूक कोंडी होते.

- मिथिला जैन, दुचाकीस्वार

एसव्ही रोडवर मेट्रोचे काम सुरू आहे. तिथे बॅरिकेट्स टाकून ठेवले आहेत. सकाळी ११ नंतर हा रस्ता खचाखच भरलेला असतो. अंधेरीतील लक्ष्मी इंडस्ट्रिज, इन्फिटी मॉल, डीएन नगर इथेही ट्रॅफिक मिळते. कारण रस्ता खराब आहे. गोरेगावपर्यंतचा हायवे ठीक आहे; पण पुढे ओशिवरा डेपो आणि बोरिवली या हायवेचा रस्ता अत्यंत खराब आहे. संध्याकाळी ६ ते ९ यादरम्यान या रस्त्यावरून गाडी चालवणे कठीण होते.

- सचिन हसम, दुचाकीचालक

रविवार आणि सोमवारी इतर दिवसांच्या तुलनेत कमी ट्रॅफिक असते; पण मुंबईतील इतर जे भाग आहेत, तिथे गाडी १०च्या वेगाने चालवावी लागते. कारण तिथे मेट्रोचे काम सुरू आहे.

- अख्तार, टॅक्सीचालक

सकाळी पिक अवर्समध्ये नेहमी ट्रॅफिक होते. कारण दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी हा एकच महत्त्वाचा मार्ग आहे. दुसरा एखादा पर्यायी मार्ग यासाठी उपलब्ध नाही. ईस्टर्न एक्स्प्रेस-वे आहे तिथे पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागतो.

- सिद्धेश कदम, वाहनचालक

सकाळी दुचाकीने मध्य मुंबईतून दक्षिण मुंबईत यायचे म्हणजे आव्हान झाले आहे. कारण ट्रॅफिक तर असतेच; परंतु दुसरीकडे लेन कटिंग एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. मी एक महिला आहे. महिला चालकाला रस्त्यावर लेन कटिंगमुळे भय उत्पन्न होते. वाहतूक पोलिसांचे गैरव्यवस्थापन यास कारणीभूत आहे.

- प्रीती गडा, प्रवासी महिला

प्रवाशांचे अनेक तास कोंडात

पी. डीमेलो रोड

पी. डीमेलो रोड हा मुंबईतील सहा किमी लांबीचा उत्तर-दक्षिण प्रवेश रस्ता आहे. पी. डीमेलो रोड हे ईस्टर्न फ्रीवेच्या दक्षिण-शेवटच्या आणि कुलाबा कॉजवेच्या उत्तर टोकाच्या दरम्यानच्या सहा किमीच्या पट्ट्याचे नाव आहे. सकाळी दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या आणि संध्याकाळी मुंबईबाहेर जाणाऱ्या वाहनांची मोठी संख्या असल्याने मोठी वाहतूक कोंडी होते. आता कर्नाक उड्डाणपूल पाडल्यामुळे आणखी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. फ्री वे ऑरेंज गेट येथे पी. डीमेलो रोड सुरू होतो. एकदा का वाहनाने फ्री-वे वर प्रवेश केला की मग घाटकोपरपर्यंत अर्ध्या तासात विनाअडथळा पोहोचता येते; परंतु पी. डीमेलो रोडवरील चिंचोळा रस्ता आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेता सीएसएमटी परिसरातून प्रत्यक्षात फ्री-वे वर पोहोचेपर्यंत सकाळी ९ ते ११ वाजताच सुमारास २० मिनिटे तरी खर्ची पडतात. संध्याकाळी गर्दीच्या वेळी तर हा प्रवास आणखी डोकेदुखीचा ठरतो.

टाईमलाईन

१०.०० डाकिया यार्ड रोड स्टेशन

१०.२० जीपीओ

१०.१६ सीएसएमटी

घाटकोपर ते सायन

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची कोंडी फोडताना झालेल्या प्रयोगांमध्ये आता पायाभूत सुविधा प्रकल्पांची भर पडलेली आहे. घाटकोपर ते सायन या टप्प्यात काही नव्याने वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची भर पडली आहे; तर काही पूर्वापार वाहतूक कोंडीच्या ठिकाणांचे उत्तर यंत्रणांना अद्यापही सापडलेले नाही. त्यामुळे घाटकोपर (रमाबाई नगर) ते सायन हा अवघा ७.७ किमीचा प्रवास एरव्ही १० मिनिटांत होतो; पण मुंबईच्या पिक अवर्सच्या कालावधीत याच प्रवासासाठी किमान एक ते सव्वा तास इतका कालावधी लागला. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये फ्लायओव्हर, मेट्रोच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्याला बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. शेल कॉलनी, कुर्ला सिग्नल, पोस्टल कॉलनी यांसारख्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होताना दिसली; तर नव्याने वाहतुकीच्या कोंडीची भर पडलेली ठिकाणे म्हणजे प्रियदर्शनी आणि अमर महाल फ्लायओव्हरनंतरचा टप्पा. या ठिकाणी सर्वाधिक वाहतूक कोंडीत प्रवास करण्याची वेळ येत आहे.

टाईमलाईन

९.३० रमाबाई नगर

९.३५ कामराज नगर

९.५५ पोस्टल कॉलनी

९.५९ कुर्ला सिग्नल

१०.५ सुमननगर जंक्शन

१०.१५ प्रियदर्शनी

१०.३० बीकेसी कनेक्टर

१०.३५ सायन फ्लायओव्हर

मानखुर्द ते सीएसटी

1 ट्राफिक ही मुंबईची मुख्य समस्या बनली असून सर्वांची डोकेदुखी वाढली आहे. मेट्रो, रस्त्यांची कामे तसेच अवैध पार्किंगमुळे या समस्येमध्ये भर पडली आहे. याचा फटका मानखुर्द ते सीएसएमटीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. सव्वा तासाच्या प्रवासासाठी प्रवाशांना दोन तास खर्ची घालावे लागत आहेत. प्रत्यक्ष पाहणीत मानखुर्दवरून सकाळी ९ :०० वाजता सुरू झालेला प्रवास सीएसएमटीजवळ ११. १० ला संपला.

2 हा मुंबई प्रवेशासाठीच्या मार्गांपैकी महत्त्वाचा मार्ग आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, कोकण भागातून येणारे प्रवासी याच मार्गे मुंबईत येतात. साधारणतः २५ किमी लांबीचा हा मार्ग आहे. वाहन ताशी ६० च्या वेगाने गेल्यास सव्वा ते दीड तासांमध्ये हा प्रवास पूर्ण व्हायला हवा; पण सध्या दोन तासांचा वेळ लागतो.

3 मानखुर्द, चेंबूर, देवनार भागात डी. एन. नगर-बीकेसी-कुर्ला-मंडाले मेट्रो २ बीचे काम सुरू आहे. त्या त्या भागातील रस्त्यावरील लेन बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यांवर केवळ एकच मार्गिका सुरू आहे. त्यामुळे या भागात धीम्या गतीने वाहने हकावी लागत आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने अवैधरीत्या पार्क केलेली दिसली. बाईकस्वार पदपथावरून बाईक चालवताना दिसले. मानखुर्द ते सीएसएमटीदरम्यान साधारणतः ४५ ते ५० सिग्नल आहेत. या सिग्नल यंत्रणेनेदेखील वाहतूक कोंडीमध्ये भर घातली.

टाईमलाईन

९.०० मानखुर्द

९.१० अनुशक्तीनगर

९.१५ देवनार

९.२० पांजरपोळ

९.३० चेंबूर नाका

९.४० स्वस्तिक पार्क

९.४५ सुमन नगर

१०.०० सायन स्टेशन

१०.२५ परळ ब्रिज

१०.४० लालबाग

१०.५५ भायखळा

११.१० सीएसएमटी

ठिकाणे

मानखुर्द सर्कल, देवनार, पांजरपोळ सर्कल, चेंबूर नाका, स्वस्तिक पार्क, सुमननगर, सायन स्टेशन, शिंदे वाडी, लालबाग सर्कल, भायखळा जंक्शन पुलावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. काही पुलांवरील वर-खाली झालेला भाग तसेच पुलावरून उतरताना इतर वाहनांमुळे गर्दी होत असल्याने या पुलांजवळ ‘स्लो ट्राफिक’ दिसले.

एका दिशेने फ्लायओव्हर खुला केल्याने रमाबाईनजीक होणाऱ्या वाहतूक कोंडीला दिलासा मिळाला आहे; पण ही वाहतूक कोंडी पुढे अमर महाल फ्लायओव्हरनंतर होतेच. त्यामुळे एक ठिकाण जरी सुटले, तरीही दुसऱ्या ठिकाणी कोंडीत अडकावेच लागते.

- राजू मुरकर, वाहनचालक

मुंबईच्या बेस्ट बसने सध्या प्रवास करणे हे पिक अवर्सच्या कालावधीत महिलांसाठी खूपच गैरसोयीचे ठरत आहे. वाहतूक कोंडीचा बसच्या फ्रिक्वेन्सीवर परिणाम होतो. त्यामुळेच कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठीही दररोजचा उशीर होतो.

- श्रद्धा नाटेकर, प्रवासी महिला

पी. डीमेलो रोड सतत मालवाहतूक वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहे. इतकेच नव्हे, तर डॉकयार्ड रेल्वे स्टेशन पूर्वेला पी. डीमेलो रोडवर मॅनहोलही खुल्या अवस्थेत असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मात्र याकडे शासनाचे लक्ष नाही. विशेष मुंबई पोर्ट ट्रस्टच्या धक्क्यावर येणाऱ्या मालवाहतूक वाहनांची बेकायदा पार्किंगची समस्या आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

- मोहन शेडगे, प्रवासी

पी. डीमेलो रोडवर दुपारी वाहनांची जास्त वर्दळ राहत नाही. त्यामुळे अवघ्या ५ ते १० मिनिटांत सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहचता येते; मात्र सकाळी ९ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ दरम्यान वाहनांची संख्या जास्त असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. प्रवासाचा वेळ अर्ध्या तासावर जातो. त्यामुळे वेळ, पैसा आणि इंधनाची प्रचंड नासाडी होते.

- आबीद खान, टॅक्सीचालक

कोंडीची ठिकाणे

  • कामराज नगर

  • शेल कॉलनी

  • पोस्टल कॉलनी

  • कुर्ला सिग्नल

  • सुमन नगर जंक्शन

  • प्रियदर्शनी

  • बीकेसी कनेक्टर

कोंडीची कारणे

  • रमाबाई येथे एमएमआरडीएकडून उड्डाणपुलाचे सुरू असलेले काम

  • कुर्ला सिग्नलच्या आधी पोस्टल कॉलनी येथे मेट्रो ४ साठीच्या कामासाठी बॅरिकेटिंग

  • आणिक आगाराच्या दिशेने येणारे ट्रॅफिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com