वाहतूक पोलिसाच्या कुटुंबियांना भरपाई 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

राठोड यांच्यामागे पत्नी निर्मला (47), मुले सविता (27), ललितसिंग (23) आणि 75 वर्षीय विधवा आई असा परिवार आहे. सदर प्रकरण मोटार प्राधिकरणाकडे अंतिम सुनावणीसाठी आले होते. राठोड कुटुंबियांच्या वतीने 62 लाख 36 हजार 261 रुपयांची नुकसान भरपाईची मागणी प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. 

ठाणे : ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या कल्याण वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस हवालदार रोहिदास राठोड यांचा 2013 मध्ये डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता. या प्रकरणात राठोड यांच्या कुटुंबियांना ठाणे मोटार अपघात विमा प्राधिकरणचे सदस्य आणि जिल्हा न्यायाधीश के. डी. वदने यांनी 32 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला. 

कल्याण काटेमानिवली येथील वाहतूक हवालदार राठोड यांचा 17 जुलै 2013 रोजी दुचाकीवरून जात असताना कल्याणच्या लाल चौकी सिग्नलनजीक भरधाव डंपरची धडक बसून मृत्यू झाला होता. या अपघातप्रकरणी डंपरचालकाविरोधात महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. राठोड यांच्यामागे पत्नी निर्मला (47), मुले सविता (27), ललितसिंग (23) आणि 75 वर्षीय विधवा आई असा परिवार आहे. सदर प्रकरण मोटार प्राधिकरणाकडे अंतिम सुनावणीसाठी आले होते. राठोड कुटुंबियांच्या वतीने 62 लाख 36 हजार 261 रुपयांची नुकसान भरपाईची मागणी प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. 

विमा कंपनीच्या वतीने ऍड्‌. पुजारी यांनी युक्तिवाद केला. यात पोलिस ठाण्यातील नोंद आणि दस्तऐवजांनुसार डंपरचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले. प्राधिकरणाच्या सदस्य आणि न्या. वदने यांनी मृतक राठोड यांच्या मृत्यूप्रकरणी 32 लाखांची नुकसान भरपाई डंपरमालक आणि विमा कंपनीद्वारे देण्याचा निकाल दिला. तसेच सदर भरपाई रक्कम दावा दाखल झाल्यापासून आठ टक्के व्याजाने देण्यात यावी, असा निर्णय दिला. 

Web Title: Traffic Police family gets Loss Compensation