भांडखोर वाहनचालकांमुळे वाहतूक पोलिस झाले हैराण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

कायदा, नियम हे लोकांच्या संरक्षणासाठीच असतात. त्याचा प्रत्येक नागरिकाने सन्मान करायला हवा. आम्हाला ज्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसारच आम्ही कारवाई करत होतो; पण या गोष्टीचा विनाकारण गहजब करण्यात आला. 
- फातिमा बागवान, सहायक पोलिस निरीक्षक. 

मुंबादेवी - मुंबई वाहतूक पोलिसांचा "रस्ता सुरक्षा सप्ताह' सुरू आहे. जे वाहनचालक हेल्मेटशिवाय गाडी चालवत आहेत, त्यांच्याकडून 500 रुपये दंड आकारला जात आहे; मात्र वाहनचालकांना अडवल्यावर ते वाहतूक पोलिसांशी वाद घालत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. 

भायखळा येथील डोंगरी जेल रोड मार्गावरील सेंट जोसेफ शाळेसमोर वाहतूक पोलिस हेल्मेटशिवाय जाणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत होते. त्या वेळी हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणारे सुरेश जैन यांना महिला सहायक निरीक्षक फातिमा बागवान यांनी थांबण्यास सांगितले आणि त्यांना दंड भरण्यास सांगितले; पण जैन यांनी बागवान यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. मी मंदिरात जात आहे, तुम्ही मला दंड ठोठावताच कसे? असा प्रश्‍न विचारत त्यांनी बागवान यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात करत दंड भरण्यास नकार देत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथे लोकांचा मोठा जमाव गोळा झाला. जैन काहीही ऐकून घेण्याच्या स्थितीमध्ये नव्हते. जमाव गोळा झाल्याचे पाहिल्यावर त्यांनी मंदिरात जाताना पोलिस दंड करतातच कसे? असे मोठ्याने बोलत आकांडतांडव करण्यास सुरुवात केली. अखेर, उपनिरीक्षक शंकर सागवेकर यांनी जैन यांच्याकडून वाहन चालवण्याचा परवाना काढून घेतला. वाहतूक पोलिसांनी ई-चलनाद्वारे दंड आकारून त्यांचे लायन्सस परत केले; पण ते न घेताच जैन निघून गेले. 

Web Title: Traffic police were agitate