माळशेज घाटात वाहतूक ठप्पच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

खबरदारीचा उपाय म्हणून मुरबाड तहसीलदारांचे आदेश

मुंबई : कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात रविवारी रात्री दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली. घाटातील हा मातीचा ढिगारा काढण्यात आला असला तरी, खबरदारीचा उपाय म्हणून येथील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुरबाड तहसीलदार अमोल कदम यांनी जारी केले आहेत.

घाटातील एक नंबर धबधबा व आवळेवाडी येथील रस्त्यावर रविवारी (ता. ४) रात्री १० वाजता मोठ्या प्रमाणात मातीचा राडारोडा व झाडे आल्याने वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सकाळी ११ वाजता हा राडारोडा जेसीबीच्या साह्याने काढण्यात येऊन एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती; मात्र रस्त्यावर राडारोडा येण्याचे प्रमाण वाढल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे धोक्‍याचे झाले आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

घाटात मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने रात्रभर या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. पोलिस निरीक्षक सुहास खरमाटे, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी हजर होते; मात्र वारा व पावसाचे प्रमाण जात असल्याने रस्त्यावरील राडारोडा काढणे रात्रभर शक्‍य झाले नाही. वाहनचालकांनी या मार्गे जाऊ नये, असे आवाहन टोकावडे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक खरमाटे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic stops in Malashej Ghat