ठाण्याला पुन्हा कोंडीचा फटका 

ठाणे : घोडबंदर रोडवर झालेली वाहतूक कोंडी
ठाणे : घोडबंदर रोडवर झालेली वाहतूक कोंडी

ठाणे : मुंब्रा बायपास रस्त्यावर पडलेले खड्डे, रबाळे भागात रस्त्यावर साचलेले पाणी, नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ तीन कारचा झालेला अपघात आणि त्यात भरीस भर म्हणून अवजड वाहनांची वाढलेली वाहतूक यामुळे ठाणे शहराला पुन्हा वाहतूक कोंडीचा फटका बसला. वाहनचालकांना मुंब्रा बायपास, ऐरोली टोलनाका, मुंबई-नाशिक महामार्ग येथे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नेहमी अर्ध्या तासात होणाऱ्या प्रवासासाठी आज वाहनचालकांना चक्क एक ते दोन तास खर्ची घालावे लागले. 

नवी मुंबईतील रबाळे येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे ऐरोलीपासून घणसोलीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे एरवी ठाण्याच्या दिशेने येण्यासाठी 15 मिनिटे लागत असताना आज एक तास खर्च करावे लागत होते. ऑनलाईन कंपन्यांची गोदामे मोठ्या प्रमाणात भिवंडी पसिरात आहेत. या गोदामांमध्ये दिवाळीपूर्वी मोठ्या प्रमाणात वस्तू आणल्या जातात. यासाठी नेहमीपेक्षा चौपट वाहनांची वर्दळ या परिसरात वाढत असते. त्यातही या अवजड वाहनांचा त्रास कमी होण्यासाठी दुपारी 12 ते 4 आणि रात्री 11 ते पहाटे ही वेळ वाहतुकीसाठी निश्‍चित करण्यात आली आहे, पण दुपारी या अवजड वाहनांची वाहतूक सुरू होताच त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतूक कोंडीचा फटका भिवंडीसह ठाणे शहराला आणि नाशिक महामार्गालादेखील बसला होता. 

अवजड वाहनांची संख्या वाढलेली असतानाच नाशिक मार्गावर मुंबई ढाबा येथे तीन कारचा अपघात झाला होता. या अपघातानेही वाहतूक विस्कळित झाली. या अपघातामुळे माणकोली ते रांजणोली नाक्‍यापर्यंत दोन्ही मार्गांवर वाहनांच्या तीन ते चार कि.मी.च्या रांगा लागल्या होत्या. भिवंडीप्रमाणेच दुपारी मुंब्रा-शिळफाटा येथील मार्गावरही अवजड वाहनांची वाहतूक 12 वाजल्यानंतर सुरू केल्यावर मुंब्रा परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. शिळफाटा मार्गावर तर वाहनचालकांना या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. मुंब्रा बायपास येथील ठाणे-पनवेल मार्गावर खड्ड्यावर टाकण्यात आलेले कॉंक्रीट अद्यापही सुकलेले नाही. त्यामुळे या मार्गावर अडथळे बसवण्यात आले आहेत. परिणामी, येथील अर्धा रस्ताच केवळ वापरात आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीत वाढ झाली होती. या वाहतूक कोंडीचा फटका थेट खारीगावपर्यंत नागरिकांना बसला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com