
Mumbai : धक्कादायक ! उरण फाट्यावरची वाहतूक कोंडी ट्रेलरमधील डिझेल संपल्याने; चालकावर कारवाई
नवी मुंबई : वायरने भरलेला माल घेऊन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरमधील डिझेल संपल्यामुळे उरण फाटा येथील उड्डाण पुलावर शुक्रवारी सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगांमुळे शेकडो चालकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकाराची सीबीडी वाहतूक पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून कोंडीस कारणीभूत ठरलेल्या ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ट्रेलरचालक रत्नेशकुमार प्रसाद (४२) हा शुक्रवारी सायंकाळी वायरचे बंडल असलेला ट्रेलर घेऊन पुण्याच्या दिशेने जात होता. अशातच सायन-पनवेल मार्गावरील उरण फाटा येथील उड्डाण पुलाजवळ डिझेल संपल्याने सायंकाळी ४ च्या सुमारास त्याचा ट्रेलर भर रस्त्यातच बंद पडला होता. या प्रकारामुळे सायंकाळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
या कोंडीत शेकडो वाहने अडकल्याने नेरूळच्या एलपीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सीबीडी वाहतूक शाखेतील पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. मात्र, या प्रकारामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी शेकडो वाहने खोळंबल्याने प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.
ट्रेलर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याने सीबीडी वाहतूक पोलिसांनी ट्रेलरचालक रत्नेशकुमार यादव विरोधात भादवि कलम २८३ सह मोटार वाहन कायदा कलम १२२, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर अशाच प्रकारची कारवाई यापुढील काळात कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
- तिरुपती काकडे, पोलिस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण विभाग