स्कॅन केलेल्या पासमुळे रेल्वेच्या कोठडीत  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

मध्य रेल्वेची दोन प्रवाशांवर कारवाई

मुंबई :  लोकलचा पास स्कॅन करून आणि क्रमांक बदलून लोकलने प्रवास करणाऱ्या दोघांना मध्य रेल्वेच्या महिला तिकीट तपासनिसांनी पकडले. गुन्हा नोंदवून त्यांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुरुवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास नेरूळ येथून पनवेलला जाणाऱ्या लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्यात गिरीश गिंतू आणि तेजस्विनी या महिला तिकीट तपासनीस कर्तव्य बजावत होत्या. त्यावेळी एका प्रवाशाकडे स्कॅन आणि लॅमिनेशन केलेला पास आढळला. मूळ पास व ओळखपत्राबाबत विचारणा केली असता, त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्याच्यासोबत असलेल्या प्रवाशानेही स्कॅन केलेला पास दाखवला. दोन्ही पासवर वेगवेगळे क्रमांक असले, तरी एकाच व्यक्तीचे नाव होते. 

महिला तिकीट तपासनिसांनी या दोन प्रवाशांना खारघर स्थानकातील कार्यालयात नेले. त्यांच्याकडील पास ओळखपत्र क्र. ९४५८ चे असून, पास क्रमांक व तारीख बदलली असल्याचे तपासणीत उघड झाले. त्यानंतर या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला. सुमित संजय गायकवाड (२२) आणि श्रीकृष्ण शंकर जाधव (२२) अशी या प्रवाशांची नावे आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the train closet due to a scanned pass