मुंबई : पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; अनेक गाड्या उशीराने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

मध्य रेल्वेच्या सर्वच मार्गांवरील उपनगरी रेल्वे पंधरा मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. तर पश्चिम रेल्वेवर धीम्या आणि जलद उपनगरी रेल्वेही विलंबाने धावत होत्या.

मुंबई : सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे आज (ता.7) पुन्हा विलंबाने धावत आहेत. मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशीरा तर पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. पावसामुळे दृश्यमानता कमी असल्याने मोटरमनला उपनगरी रेल्वे चालवणे कठीण होऊन जाते. 

मंगळवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून शनिवारी (ता.7) पुन्हा शहराला चांगलेच झोडपले आहे. यामुळे मध्य आणि पश्चिम लोकल रेल्वे सेवांवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवरील सर्वच मार्गांवरील उपनगरी रेल्वे पंधरा मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. तर पश्चिम रेल्वेवर धीम्या आणि जलद उपनगरी रेल्वेही विलंबाने धावत होत्या. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आणि कमी दृश्यमानतेमुळे मोटरमनला रेल्वे चालवणे कठीण होत होते. त्यामुळे सीएसएमटी, चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ा उशिराने धावत होत्या. याचा परिणाम गाड्यांच्या वेळापत्रकावरही दिसून आला.

मुसळधार पावसामुळे लांबपल्याच्या गाडयांनाही फटका बसला आहे. मुबंईत येणाऱ्या आणि मुंबईहुन निघणाऱ्या मेल/एक्सप्रेस एक ते दोन तास उशिराने धावत आहेत. यांमध्ये 'मांडवी एक्सप्रेस' दोन तास उशिराने धावत होती. तर, सीएसएमटी ते सावंतवाडी 'गणपती विशेष गाडी' पाच तास उशिराने धावत आहे. त्यामुळे आता गणेशोत्वसाठी गावी गेलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाच्या वेळी गर्दीचा सामना करावा लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trains running late due to heavy rains in mumbai