मृत आणि सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पालिकेचा भोंगळ कारभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kdmc

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून 17 मार्च ला सफाई कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदलीच्या आदेशात 159 कामगारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली होती.

KDMC: मृत आणि सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पालिकेचा भोंगळ कारभार

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिका मधील 159 सफाई कामगारांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. बदली सफाई कामगारांच्या यादीच एक दोन नाही तर 8 सेवानिवृत्त कर्मचारी आणि 2 मृत कर्मचाऱ्यांची नावे देखील समाविष्ट असल्याने एकच चर्चा रंगली. ही चूक लक्षात येताच पालिका प्रशासनाने तात्काळ हा आदेश रद्द करत नविन आदेश जारी केला आहे. मात्र या प्रकारामुळे पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून 17 मार्च ला सफाई कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदलीच्या आदेशात 159 कामगारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या यादीत 2 मृत कामगार व 8 सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या नावाचा देखील समावेश होता. या नावांमुळे पालिका वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली. ही यादी देखील समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

प्रत्यक्षात प्रभाग अधिकाऱ्यांकडून सफाई कामगारांची यादी महापालिकेकडे पाठवली जाते. त्यानंतर महापालिकेकडून या यादीवर शिक्कामोर्तब केला जातो. यादी पाठविणाऱ्या आणि यादीवर सह्या करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या कामगारांच्या नावांची शहानिशा का केली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. पालिका प्रशासनाला चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ हा आदेश रद्द करत नविन आदेश जारी केला आहे. यामध्ये यादी दुरुस्त करण्यात आली असून पुन्हा नविन यादी बनवित दुरुस्त यादी जाहीर करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालिकेतील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

याप्रकरणी पालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले 17 मार्चला जे बदल्यांचे आदेश काढलेले होते. ते बदल्यांचे आदेश वितरीत करण्या आधीच ती चूक आमच्या लक्षात आली होती. त्यामुळे ती ऑर्डर आम्ही काढलेली नव्हती ती त्या दिवशीच रद्द करण्यात आली. त्या दिवशीच दुसरे आदेश काढण्यात आले आहे. नविन आदेशानुसार बदल्या होतील. जुनी ऑर्डर आम्ही वितरीत केलीच नव्हती.