अशोका धबधब्याचा "इको टुरिझम'द्वारे कायापालट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

"इको टुरिझम'च्या माध्यमातून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत.

शहापूर : तालुक्‍यातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या विहीगाव येथील अशोका धबधब्याला "इको टुरिझम'चा दर्जा प्राप्त झाला असून, त्याचे उद्‌घाटन आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक डी. पी. निकम, विहीगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एन. पी. बागराव, प्रभारी पोलिस अधिकारी कुंदन जाधव, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती निखिल बरोरा, सरपंच दुर्वास निरगुडे आदी उपस्थित होते. 

कसाऱ्यापासून जवळच विहीगाव वनराईत लपलेला अशोका धबधबा पाच वर्षांपासून पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. यापूर्वी धबधब्यावर पोहोचण्यासाठी पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता. आमदार पांडुरंग बरोरा यांनी मागील वर्षी पर्यटनस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून तत्कालीन तहसीलदार अविनाश कोष्टी, विहीगाव वन विभाग अधिकारी एन. पी. बागराव यांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्यासाठी बरोरा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लाख रुपयांचा निधी मंजूर केला.

"इको टुरिझम'च्या माध्यमातून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत. त्या उतरताना वयोवृद्ध पर्यटकांना आधार म्हणून पायऱ्यांच्या बाजूने लोखंडी ग्रील उभारण्यात आल्या आहेत. सिमेंटचा कट्टा, महिलांसाठी कक्ष, उपचार कक्ष आदी सुविधांच्या उपाययोजना देण्यात आल्या आहेत. 

Web Title: Transforming Ashoka Falls to Echo Tourism