मेट्रोच्या कामासाठी नरसी मेहता मार्गावर एका बाजूकडील वाहतूक बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

जागृतीनगर येथील मेट्रोच्या कामासाठी नरसी मेहता मार्गावर एका बाजूकडील वाहतूक बंद करण्यात आली आहे. याबाबत सूचना न दिल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. 

मुंबई : अंधेरी-घाटकोपर लिंक रोडजवळील जागृतीनगर येथील मेट्रोच्या कामासाठी नरसी मेहता मार्गावर एका बाजूकडील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हे निर्बंध 11 नोव्हेंबरपर्यंत लागू असतील. याबाबत सूचना न दिल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. 

जागृती नगर-नरसी मेहता मार्गाच्या दक्षिण वाहिनीवर (जागृती नगर ते माणिकलाल कंपाऊंड) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो पुलाचे बांधकाम हाती घेतले आहे. त्यामुळे जागृती नगर मेट्रो स्थानकाजवळील शिवसेना शाखा क्रमांक 129 (नरसी मेहता मार्ग) ते लालबहादूर शास्त्री मार्ग (उत्तर वाहिनी) येथे वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

शिवसेना शाखेजवळून लालबहादूर शास्त्री मार्गापर्यंत पर्यायी मार्गिका देण्यात आली आहे. वाहनांना अंधेरी-घाटकोपर लिंक रोड (उत्तर वाहिनी) ते श्रेयस जंक्‍शनपर्यंत (लिंक रोड) जाता येईल. तेथून उजव्या हाताला वळण घेऊन लालबहादूर शास्त्री मार्गाचा वापर करता येईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transport restrictions for metro work