Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे सर्व वाहतूक सेवा ठप्प

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 27 जुलै 2019

पावसाचा विमानसेवेवरही परिणाम 

महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर येथे अडकली 
 

मुंबई : मुसळधार पावसाचा रेल्वेच्या तिन्ही सेवांवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची लोकल सेवा 20 मिनिटे उशिराने सुरु आहे. हार्बर मार्गावरील लोकल 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. ट्रान्सहार्बर मार्गावरची लोकलसेवा 5 ते 10 मिनिटे उशिराने सुरु आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही 5 मिनिटे उशिराने सुरु आहे. 

ठाणे, कल्याण, नवी मुंबई पट्ट्यात शुक्रवार, संध्याकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे पाणी साचल्याने अनेक रेल्वे स्थानकातील रूळ जलमय झाले आहेत. त्यामुळे रेल्वे तसेच लोकल सेवेला फटका बसला आहे.

मध्य रेल्वेची बदलापूर ते कर्जत ही लोकलसेवा बंद करण्यात आली आहे. या मार्गावर झालेला बिघाड दुरुस्त केल्यानंतर ही सेवा पूर्ववत होईल. तसेच काही वेळापूर्वी बदलापूर ते कल्याण ही लोकलसेवाही पुढील सुचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकात त्यासंदर्भातली घोषणा करण्यात येत होती. सायन आणि कुर्ला या दोन स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.

पावसाचा विमानसेवेवरही परिणाम 
मुंबईत पडणाऱ्या सततच्या पावसामुळे त्याचा परिणाम विमान सेवेवर देखील झाला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळवरून जाणाऱ्या 7 फ्लाईट्स रद्द केल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे. तर 8 ते 9 विमानांची दिशा खराब हवामानामुळे बदलण्यात आली आहे.

महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर येथे अडकली 
मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी रेल्वे ट्रॅकवर आल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस ही बदलापूर येथे अडकली. गाडी नदीच्या जवळच असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. पाण्याची पातळी वाढत असून पाणी गाडीत शिरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र त्यामुळे एक्सप्रेसमध्ये अडकलेले जवळपास 2000 प्रवासी अडकले. काल रात्री साडेआठ वाजता मुंबईहून कोल्हापुरकडे रवाना झालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या काही डब्यांमध्ये बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पाणी शिरले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transport service are shutting down due to heavy rain at Mumbai