कंपाऊंडरकडून रुग्णांची चिकित्सा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

नवी मुंबई - डॉक्‍टरांऐवजी औषध-गोळ्या देणाऱ्या कंपाऊंडरकडून रुग्णांची चिकित्सा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार कोपरखैरणेतील नागरी आरोग्य केंद्रात बुधवारी (ता. १९) सकाळी उघडकीस आला. या नागरी आरोग्य केंद्रात सकाळी डॉक्‍टर नसल्यामुळे तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची चक्क कंपाऊंडरने चिकित्सा करण्यास सुरुवात केली. हा प्रकार तेथील एका रुग्णाच्या लक्षात आल्यावर त्याने याबाबत विचारणा केली, तेव्हा डॉक्‍टर नसल्यामुळे आपण हे करीत असल्याचे सांगून नंतर त्याने केंद्रातून पळ काढला. 

राज्यातील श्रीमंत महापालिका असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला लागलेले वादाचे ग्रहण काही सुटलेले नाही. कधी यंत्रणा, तर कधी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे नेहमी चर्चेत असलेल्या आरोग्य विभागात असमन्वयाचा उत्तम नमुना पाहायला मिळाला. कोपरखैरणेत महापालिकेचे शंकर शिनवार दळवी हे नागरी आरोग्य केंद्र आहे. कोपरखैरणेतील माताबाल संगोपन केंद्र बंद असल्यामुळे या नागरी आरोग्य केंद्रावर परिसरातील रुग्णांचा मोठा ताण आहे. येथे दररोज सकाळी ८ वाजल्यापासून रुग्णांची गर्दी असते. नेहमीप्रमाणे आजही आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी झाली होती; मात्र केंद्रात डॉक्‍टर आले नसल्याने औषध-गोळ्या देणाऱ्या कंपाऊंडरने रुग्णांना तपासण्यास सुरुवात केली. त्यांना तपासून तो काही गोळ्या व औषधे लिहून देत होता. हा प्रकार रांगेत असलेल्या एका रुग्णाच्या लक्षात आला. रुग्णांना तपासणारी व्यक्ती डॉक्‍टर नसल्याने त्याने डॉक्‍टर कुठे आहेत? तू काय करतोय असे विचारल्यावर, संबंधित कंपाऊंडरची भांबेरी उडाली. डॉक्‍टर कामावर आले नसल्यामुळे आपणच सकाळपासून हे काम करत असल्याचे सांगून त्याने केंद्रातून पळ काढला. घडलेल्या या प्रकारानंतर नागरी आरोग्य केंद्रात एकच गोंधळ उडाला होता. रांगेत उभ्या असलेल्या रुग्णांना काय चालले आहे ते कळत नव्हते. डॉक्‍टरच येथे नसल्याचे या रुग्णाने इतरांना सांगितल्यानंतर ते सर्वजण निघून गेले. या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर या केंद्रात डॉ. उज्ज्वला बारापात्रे या वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त असल्याचे उघडकीस आले. त्या गणेशोत्सवासाठी रजेवर असल्यामुळे त्यांनी हा पदभार महापेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देशपांडे यांच्याकडे दिला होता. त्यामुळे ते कोपरखैरणेतील केंद्रावर जाणे गरजेचे होते; मात्र ते तेथे गेले नसल्यामुळे रुग्णांना कंपाऊंडरकडून उपचार घ्यावे लागले. हा प्रकार एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्‍यता आहे.

घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक आहे. याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जाईल. डॉक्‍टरांनी दुसऱ्याकडे चार्ज दिला असतानाही दुसरा डॉक्‍टर तेथे का गेला नाही, याची चौकशी केली जाईल.
- रमेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त

Web Title: Treatment of patients by compound