टेलीमेडिसीनद्वारे होणार माता आणि बालमृत्यूप्रकरणी उपचार 

health issue
health issue

मुंबई : पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू आणि मातामृत्यूला आळा घालण्यात यंत्रणांना काही अंशी यश आले असले, तरी त्याचा आलेख आणखी खाली आणण्यासाठी गंभीर बालक व माता यांच्यावर मुंबईतील तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने आहे त्याच ठिकाणी उपचार करण्यासाठी नवी टेलीमेडिसीन उपचार पद्धती सुरू करण्याची संकल्पना माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आखली आहे. त्यासाठी मुंबईतील नानावटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांची टीम सहकार्य करणार आहे. त्याबाबतची बैठक नुकतीच नानावटी हॉस्पिटलमध्ये झाली. 

गेल्या आठवड्यात डॉ. सावंत यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. त्या वेळी त्यांनी जव्हार कुटीर रूग्णालय, जामसर आणि साकुर प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिली होती. त्या वेळी त्यांच्यासोबत पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थित होते. गंभीर बालक आणि मातांवर त्याच ठिकाणी उपचार करण्यासाठी अडचणी येत असल्याचे डॉ. सावंत यांच्या समोर येताच त्यांच्यावरील उपचारासाठी त्यांनी टेलीमेडिसीन संकल्पना आखली. त्यांनी तातडीने मुंबईतील नानावटी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटणकर यांच्याशी चर्चा केली. नानावटी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तज्ज्ञ डॉ. दीपक पाटकर आणि पालघरच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांची नानावटी हॉस्पिटलमध्ये संयुक्त बैठक घेतली. नानावटी हॉस्पिटलच्या स्रीरोग व बालरोग तज्ज्ञांनी टेलीमेडिसीनद्वारे उपचार करण्यास सहकार्य करण्याची तयारी बैठकीत दर्शवली. त्यादृष्टीने नानावटी हॉस्पिटलमध्ये आदिवासी ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांना तातडीने दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

अशी आहे टेलीमेडिसीन उपचार पद्धती
कुपोषित, दुर्धर अथवा गंभीर आजाराने पीडित माता व बालकांची आजाराची लक्षणे, न समजणारा आजार आणि औषधांविषयी व्हिडीओ कॉलने नानावटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांना माहिती दिली जाईल. त्यावर येथील माता अथवा बालकाचा जीव वाचवण्यासाठी तातडीने कोणते उपचार केले पाहिजेत, यावर तज्ज्ञ डॉक्‍टर सल्ला देतील. डिजिटल सहीने गोळ्या, औषधे आणि उपचार पद्धतीचे प्रिस्क्रिप्शन तज्ज्ञ डॉक्‍टर देणार आहोत. अतिगंभीर रुग्णास नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. 

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागाशी माझी नाळ जोडली गेली आहे. जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून उपचार होण्यासाठी टेलीमेडिसीन  संकल्पना आखली आहे. त्यासाठी नानावटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांनी सहकार्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यावर तातडीने अंमलबजावणी होणार असून माता व बालमृत्यू रोखले जातील. 
- डॉ. दीपक सावंत, माजी आरोग्य मंत्री 

गंभीर माता व बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी टेलीमेडिसीन उपचारपद्धती प्रभावी ठरणार आहे. त्यासाठी येथील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना तातडीने दोन दिवसांचे प्रशिक्षण घेण्यासाठी नानावटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येणार आहे. या उपचार पद्धतीमुळे माता व बालमृत्यूला निश्‍चितच आळा बसेल.
- डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com