मेट्रो कारशेडसाठी आरेत वृक्षतोड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

भाजपने कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने आरे वसाहतीत मेट्रोची कारशेड उभारण्यासाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव महापालिकेत मंजूर करून घेतला.

मुंबई: युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा विरोध असतानाही भाजपने कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने आरे वसाहतीत मेट्रोची कारशेड उभारण्यासाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव महापालिकेत मंजूर करून घेतला. भाजपच्या या खेळीमुळे धक्का बसलेली शिवसेना न्यायालयात धाव घेणार आहे. राज्याच्या राजकारणात "आमचं ठरलं आहे' असे सांगणाऱ्या शिवसेनेवर "आमचं बिघडलं आहे' असं म्हणण्याची पाळी आल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

आरे वसाहतीत मेट्रोची कारशेड उभारण्यात अडथळा ठरणारी 2700 झाडे तोडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवत आंदोलनालाही पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेने वृक्ष प्राधिकरण समितीत या संदर्भातील प्रस्तावाला सलग तीन वेळा विरोध केला होता. त्यानंतर त्रिसदस्य समितीतर्फे आरे परिसराची पाहणी करून मेट्रो कारशेडबाबत निर्णय घेण्याचे ठरले. त्यानुसार या समितीने कांजूर मार्ग, बीपीटी ही ठिकाणे सुचवली. शिवसेनेनेही या निर्णयाचा दाखला देत, आरेमध्येच कारशेडचा अट्टहास का, असा प्रश्‍न उपस्थित केला आणि तेथील आदिवासी पाड्यांकडे लक्ष वेधत वृक्षतोडीचा प्रस्ताव रोखून धरला. 

गुरुवारी (ता. 29) वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत 2700 वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्याचा प्रस्ताव पुन्हा मांडण्यात आला. शिवसेनेने विरोधाची भूमिका मांडली; मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला साथ देत वृक्षतोडीच्या बाजूने मतदान केले. प्राधिकरण समितीच्या तीन तज्ज्ञांनीही वृक्षतोडीचे समर्थन केले. कॉंग्रेसच्या दोन सदस्यांनी सभात्याग केला. त्यामुळे वृक्षतोडीच्या बाजूने 8 मते आणि विरोधात 6 मते पडली. परिणामी वृक्षतोडीचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला. दरम्यान, या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. त्यामुळे आरे वसाहतीमधील वृक्षतोडीवरून शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा ठिणगी पडण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेना जाणार न्यायालयात 
वृक्षतोडीच्या बाजूने भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व तज्ज्ञांनीही मतदान केले. त्यावरून तज्ज्ञांचे आर्थिक हितसंबंध असल्याची शंका येते. म्हणून अशा तज्ज्ञांना नियुक्ती रद्द करून परत पाठवायला हवे, अशी प्रतिक्रिया स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. झाडे कापण्याविरोधात 80 हजार हरकती आल्या असताना प्रशासनाने थातुरमातुर उत्तर दिले. प्रशासन म्हणते, की तेथे आदिवासी पाडेच नाहीत. एकीकडे भाजप झाडे लावा म्हणते आणि दुसरीकडे वृक्षतोडीचे समर्थन करते, अशी टीकाही त्यांनी केली. मेट्रो कंपनीचे हित साधणाऱ्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

"बेस्ट' देवाणघेवाण? 
मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीपुढे येण्यापूर्वी बुधवारी (ता. 28) रात्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मेट्रो प्रकल्पाच्या महाव्यवस्थापक अश्‍विनी भिडे, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची "मातोश्री' येथे बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत आयुक्तांनी बेस्ट कामगारांना सातवा वेतन आयोगापोटी 780 कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर शिवसेनेने वृक्षतोडीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. केवळ देखावा म्हणून शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध केल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञ आणि विरोधी पक्षांशी चर्चा केली. त्यानंतर भाजपने विरोधी पक्षांना सोबत घेत मेट्रोमधील अडथळा दूर केला. दरम्यान, ही भाजप आणि शिवसेना यांची अंतर्गत खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trees for the Metro Car shed in aare mumbai