झाडांना खिळे पालिकेनेच ठोकले | Dombivli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाडांना खिळे पालिकेनेच ठोकले

डोंबिवली : झाडांना खिळे पालिकेनेच ठोकले...

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : झाडांना खिळे ठोकून जाहिराती, बॅनरबाजी करण्यास सक्त मनाई करत असे केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे आदेश पालिका आयुक्तांनी मागील महिन्यातच काढले आहेत. याच आदेशाचे उल्लंघन खुद्द उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने केल्याचे डोंबिवली पश्चिमेत मोठागांव परिसरात दिसून येते. मोठागांव मानकोली लिंकरोडमध्ये बाधित होणाऱ्या 20 झाडांवर पालिकेनेच खिळे ठोकून नोटीस लावली आहे. वृक्ष प्राधिकरण विभागच नियमांच उल्लंघन करणार असेल तर वृक्ष संवर्धन जनजागृतीचा फायदा काय असा सवाल पर्यावरण प्रेमी करत आहेत.

मोठागांव मानकोली लिंकरोडमध्ये बाधित होणाऱ्या 20 झाडांवर पालिकेनेच खिळे ठोकून नोटीस लावली

मोठागांव मानकोली लिंकरोडमध्ये बाधित होणाऱ्या 20 झाडांवर पालिकेनेच खिळे ठोकून नोटीस लावली

झाडांवर लोखंडी खिळे आणि तारेचा वापर करून विद्युत रोषणाई, बॅनरबाजी, जाहिराती करण्यास हरीत लवादाने सक्त मनाई केली आहे. अशा पद्धतीने झाडांना इजा पोहोचवणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ऑक्टोबर महिन्यात झाडांना खिळे ठोकून जाहिराती करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश जारी केले आहेत. तसेच आदेश जारी होताच तीन दिवसांत जाहिराती हटविण्यात याव्यात असे देखील त्यात नमूद आहे. पालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागासच मात्र या आदेशाचा विसर पडलेला दिसतो.

हेही वाचा: रत्नागिरी : आभासी वाहन चालवण्याची यंत्रणा आता प्रत्येक आरटीओत!

डोंबिवली पश्चिमेतील मोठागांव मानकोली लिंकरोड रस्त्यावरील उल्हास खाडीवर सहा पदरी पूल उभारणीचे काम सुरू आहे. या विकास कामात बाधित होणारी झाडे तोडणे किंवा पुनर्रोपण करण्यास एमएमआरडीएने परवानगी दिली आहे. मोठागांव येथील भूखंडावर 22 झाडे असून यातील 20 झाडे नवीन रस्ता विकास कामात बाधित होत आहेत. याविषयी हरकत असल्यास 7 दिवसांत ती नोंदवावी अशा आशयाची नोटीस उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने जारी करण्यात आली आहे. या बाधित सर्व झाडांवर खिळे ठोकून ही नोटीस लावली गेली असल्याने पालिकाच नियमांचे उल्लंघन करत असल्याने पर्यावरण प्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत.

झाडांना खिळे ठोकून इजा पोहोचवू नका या विषयी आम्ही आधीपासून जागृती करत आहोत. केडीएमसी प्रशासनाने देखील मागील महिन्यात नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई येईल असे आदेश जारी केले आहेत. विकास कामात बाधित होणाऱ्या 20 झाडांना नोटीस लावण्यासाठी खिळे ठोकण्यात आलेत हे खेदजनक आहे. त्यांचे पुनर्रोपण होणार असल्यास त्यांना खिळे हानिकारकच आहेत.

अविनाश पाटील, खिळे मुक्त झाड अभियान, टीम परिवर्तन याविषयी मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

loading image
go to top