स्थलांतरितांचे कुपोषण रोखण्यासाठी प्रणाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tribal women System to prevent migrant malnutrition mumbai

स्थलांतरितांचे कुपोषण रोखण्यासाठी प्रणाली

मुंबई : वीटभट्टी आणि ऊसतोड कामगारांमध्ये आदिवासी महिलांचे प्रमाण जास्त आहे. कामानिमित्ताने गाव सोडल्यानंतर या स्थलांतरीत महिलांचे आणि बालकांचे कुपोषण मोठ्या प्रमाणात होते. ते रोखण्यासाठी स्थलांतरित गर्भवती, स्तन्यदा माता आणि बालकांची अद्यायावत माहिती तत्काळ एकाच प्रणालीवर उपलब्ध करणाऱ्या देशातील पहिल्यांदा महाराष्ट्र स्थलांतर निरीक्षण प्रणालीचे (मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टिम- एमटीएस) उद्‍घाटन महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.

देशात प्रथम महाराष्ट्रात सुरु होणारी ही प्रणाली महिला व बालविकास विभागाने विकसित केली आहे. लोढा म्हणाले, ‘ विभागाने वैयक्तिक विशिष्ट ओळख क्रमांकांद्वारे असुरक्षित हंगामी स्थलांतरित लाभार्थ्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी संकेतस्थळ आधारित ‘एमटीएस’ यंत्रणा तयार केली आहे. या प्रणालीमुळे हंगामी स्थलांतरित महिला व बालकांची माहिती तत्काळ उपलब्ध होईल. यामुळे लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देणे सहज होणार आहे.मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमात महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास आयुक्त आर. विमला, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होत्या.

पथदर्शी प्रकल्प मार्गदर्शक

प्रधान सचिव आय.ए. कुंदन म्हणाल्या की, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चंद्रपूर, अमरावती, जालना, पालघर, नंदुरबार आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर या प्रणालीच्या मदतीने संकेतस्थळावर आधारित अॅपमध्ये लाभार्थ्यांची माहिती भरण्यास सुरवात केली होती. महिला व बालकांच्या स्थलांतराच्या प्रक्रियेचा अभ्यास करुन अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांच्या मदतीने मोबाईल अॅपमध्ये लाभार्थ्यांची माहिती भरण्यात आली होती. आता राज्यभर स्थलांतरित लाभार्थ्यांची नोंद घेण्याची प्रक्रिया या मोबाईल अॅपमध्ये सुरु होणार आहे.

राजमाता मिशन कार्यक्रम अधिकारी तिक्षा संखे, शिवानी प्रसाद, दिग्विजय बेंद्रीकर शिंदे यांनी ही प्रणाली विकसित केली आहे.https://mahamts.in/login हे संकेतस्थळ असून गुगल प्ले स्टोअरमध्ये MahaMTS हे ॲप उपलब्ध आहे.

योजनांसाठी उपयोग

MahaMTS ॲप आणि https://mahamts.in/login मध्ये माहिती आहार वाटप, लसीकरण, अमृत आहार योजना, आरोग्य तपासणी इ. प्रभावीपणे राबवता येऊ शकते. गर्भवती, स्तन्यदा महिला, तीन वर्षे, तीन ते सहा वर्षे व ६-१८ वर्ष वयोगटातील मुलांचा मूळ पत्ता हंगामी स्थलांतरित होण्याची कारणे याची संपूर्ण माहिती मिळू शकते.