कावळ्यांना अंगावर खेळवणारा अवलिया!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

आपण अनेक प्राणी-पक्ष्यांवर प्रेम करतो; मात्र कावळ्यांवर कोणीच प्रेम करीत नाही. कावळा अत्यंत चाणाक्ष आणि स्वच्छता राखणारा पक्षी आहे. कावळ्यांच्या सान्निध्यात राहून खूप समाधान मिळते.
- त्रिक्रमजी ठक्कर, मुलुंड

भांडुप -  माणसाला कावळ्याचा झालेला स्पर्श अशुभ समजला जातो; मात्र मुलुंडमधील ७० वर्षांचे त्रिक्रमजी ठक्कर कावळ्यांना चक्क अंगाखांद्यावर खेळवतात. त्यांच्या एका शिटीचा आवाज ऐकून परिसरातील कावळे त्यांच्याभोवती जमा होतात. दीड हजाराहून अधिक कावळे त्यांचे मित्र झाले आहेत. त्यामुळे मुलुंडमध्ये ते ‘कावळेवाले काका’ या नावानेच ओळखले जातात.

मुलुंड येथील योगी हिल सोसायटीत राहणारे ठक्कर व्यवसायाने ब्रोकर आहेत. लहानपणापासून त्यांना पशुपक्ष्यांची आवड आहे. ते परिसरातील कुत्र्यांना शिटी मारून बोलावून खाऊ घालत. ठक्कर यांनी मारलेल्या एका शिटीवर कुत्रे जमा होत असल्याचे पाहून एका मित्राने एकदा कावळ्यांना शिटी मारून गोळा करून दाखवल्यास दहा हजार रुपये देईन, अशी पैज लावली. तेव्हापासून ठक्कर यांनी शिटी मारून कावळ्यांना बोलावून खाऊ घालू लागले. लवकरच कावळ्यांनाही त्यांचा लळा लागला. ४५ वर्षांपासून त्यांची आणि कावळ्यांची गट्टी आहे. ते रोज सकाळी चिवडा, दही-भात घेऊन घराबाहेर पडतात. त्यांनी मारलेली शिटी ऐकून जमा होणारे कावळे या नाश्‍त्यावर मनसोक्त ताव मारतात. त्यापैकी अनेक ठक्कर यांच्या अंगाखांद्यावरही बसतात. ठक्कर यांनी कावळे, कुत्री तसेच अन्य प्राण्यांसाठी त्यांच्या इमारतीजवळ सिमेंटचे छोटे-छोटे हौदही बनवले आहेत.

Web Title: Trikramji Thakkar stroy