हुतात्मा कौस्तुभ यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मिरा रोड : काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन दोन दिवस झाले असतानाच राणे कुटुंबीयांच्या नावे पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावाने सोशल मीडियावर बनावट ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू करून ही क्‍लिप फॉरवर्ड करू नका, असे आवाहन केले आहे. 

हुतात्मा कौस्तुभ राणे यांच्या पत्नीचे मनोगत म्हणून सात मिनिटांची ऑडिओ क्‍लिप सोशल मीडियावर दोन दिवसांपासून व्हायरल झाली आहे. काही संदेशांत त्यांचे तथाकथित मनोगत आहे. ही ऑडिओ क्‍लिप बनावट असून त्यामुळे हुतात्मा कौस्तुभ राणे यांच्या पत्नीला मनस्ताप झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कौस्तुभ यांचे मावसभाऊ मिहीर हेदवकर यांनी समतानगर पोलिस ठाण्यात तक्रार केली असून सहायक पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी तपास करीत आहेत. 

ही ऑडिओ क्‍लिप बनावट तसेच हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा अपमान करणारी असल्याने कोणीही फॉरवर्ड करू नये. नागरिकांनी आपल्या जबाबदारीचे भान राखून हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मान राखावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक वसंत लब्दे यांनी केले आहे. क्‍लिप तयार करणाऱ्यांचा शोध सुरू असून ती फॉरवर्ड करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

पैसे गोळा करण्याचे प्रकार 
हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या नावे निधी जमवण्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. राणे कुटुंबीयांना मदत करण्याचा बहणा करून काही जण नागरिकांकडून पैसे गोळा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना नाहक मनस्ताप होत आहे, असे कौस्तुभ यांच्या मामी वर्षा जाधव यांनी सांगितले. कौस्तुभ यांच्या वीरमरणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नका; हुतात्म्याची पत्नी व कुटुंबीयांना मनस्ताप होईल, असे काहीही करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

Web Title: troubles to the family members of Hutatma Kaustubh