कमी दराने तूर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई - सुभाष देशमुख

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई - केंद्र शासनाने या वर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे 5 हजार 675 रुपये इतकी निश्‍चित केली आहे. राज्यात आधारभूत किमतीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव पणन विभागाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे. आधारभूत किमतीने तूर खरेदी केंद्र राज्यात लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना तूर विक्री करू नये, असे आवाहन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

गेल्या वर्षीच्या हंगामात 2 फेब्रुवारी 2018 पासून खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती. यंदाच्या हंगामातील आधारभूत किमतीने तूर खरेदी केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना तूर विक्री करू नये आणि ही विक्री करीत असताना शेतकऱ्यांनी 7/12 उतारा व्यापाऱ्यांना देऊ नये, असेही देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Tur Purchasing Crime Subhash Deshmukh