शिधावाटप दुकानांत तूरडाळीचा तुटवडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

नवी मुंबई : तूरडाळीच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड केल्यानंतर "सकाळ'च्या बातमीदारांनी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांमधील तूरडाळीच्या परिस्थितीची पाहणी केली. त्या दुकानांमध्ये तूरडाळीचा तुटवडा असल्याचे या पाहणीत उघड झाले. पैसे भरूनही दोन महिने तूरडाळ मिळालेली नसल्याचे कांदिवली पूर्व-पश्‍चिमेकडील काही दुकानदारांनी सांगितले; तर मागणी करूनही डाळ मिळालेली नसल्याचे धारावीतील एका दुकानदाराने सांगितले. मे महिन्यात पैसे जमा केल्यानंतर जुलैमध्ये तूरडाळ मिळाल्याचे दहिसरमधील काही शिधावाटप दुकानदारांनी सांगितले.

नवी मुंबई : तूरडाळीच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड केल्यानंतर "सकाळ'च्या बातमीदारांनी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांमधील तूरडाळीच्या परिस्थितीची पाहणी केली. त्या दुकानांमध्ये तूरडाळीचा तुटवडा असल्याचे या पाहणीत उघड झाले. पैसे भरूनही दोन महिने तूरडाळ मिळालेली नसल्याचे कांदिवली पूर्व-पश्‍चिमेकडील काही दुकानदारांनी सांगितले; तर मागणी करूनही डाळ मिळालेली नसल्याचे धारावीतील एका दुकानदाराने सांगितले. मे महिन्यात पैसे जमा केल्यानंतर जुलैमध्ये तूरडाळ मिळाल्याचे दहिसरमधील काही शिधावाटप दुकानदारांनी सांगितले. डाळीचा उशिरा पुरवठा झाल्याने 35 रुपये भाव असूनही साठा शिल्लक राहिल्याची माहिती बोरिवलीतील दुकानदारांनी दिली. 

ऑगस्टची डाळ अजूनही मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यातील कोपरी, ज्ञानेश्‍वरनगर आणि साठेनगरमधील दुकानदारांनाही पैसे भरूनही डाळ मिळालेली नाही. तीन महिन्यांपूर्वी डाळीसाठी 22 हजार रुपये भरूनही शिधावाटप विभागातर्फे डाळीचा पुरवठा झालेला नसल्याचे अंबरनाथमधील दुकानदार कुंदन गुप्ता यांनी सांगितले. शहापूरमध्ये गेल्या महिन्यापासून तूरडाळ आलेली नसल्याचे तेथील शिधावाटप दुकानदार सुनील गोपाळे यांनी सांगितले. भिवंडी शहरातील शिधावाटप दुकानदार जगन्नाथ खिसमतराव यांनी मे व जुलै महिन्यात 18 हजार रुपये, तर के. बापू यांनी 12 हजार रुपये जमा केले आहेत; मात्र जिल्हा शिधावाटप नियंत्रण कार्यालयाच्या कारभारामुळे त्यांना डाळ मिळालेलीच नाही. कल्याणमध्येही अशीच परिस्थिती आहे. पैसे देऊनही आम्हाला तूरडाळ मिळाली नसल्याचे कल्याण पूर्वेकडील एका दुकानदाराने सांगितले. "कल्याण पश्‍चिम-आंबिवली परिसरातील सुमारे शंभर शिधावाटप दुकानांपैकी 50 टक्के दुकानांमध्ये गेल्या महिन्यापासून तूरडाळ आलेली नाही. 

मुरबाड तालुक्‍यातही दोन महिन्यांत डाळ मिळालेली नसल्याचे काही दुकानदारांनी सांगितले; तर आम्हाला तूरडाळीसाठी अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागते, असे डोंबिवली पूर्वेकडील आयरे गावातील एका शिधावाटप दुकानदाराने सांगितले. उल्हासनगरमध्येही हीच स्थिती आहे. रायगड जिल्ह्यातही तूरडाळीचा तुडवडा असल्याचे उघड झाले. शिधावाटप दुकानांत 35 रुपये किलो भावाने तूरडाळ मिळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक ग्राहक डाळ घेण्यासाठी आले होते; मात्र, पैसे भरून दोन महिने झाल्यानंतरही सरकारकडून डाळ उपलब्ध झालेली नाही, असे खारघरमधील मुर्बी गावातील भरत पाटील या दुकानदाराने सांगितले. 

सहा महिन्यांपासून तूरडाळ गायब 
तीन महिन्यांत तूरडाळ आलेलीच नसल्याचे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्‍यातील कुडूस, नारे, मुसारणे आदी गावांतील दुकानदारांनी सांगितले. बोर्डी परिसरातील शिधावाटप दुकानांत तर सहा महिन्यांपासून तूरडाळ नसल्याचे उघड झाले. मोखाडा, जव्हार आणि विक्रमगडमध्येही हीच स्थिती आहे. 

'सकाळ'च्या मोहिमेचे कौतुक 
तूरडाळीच्या काळ्या बाजाराविरोधात "सकाळ'ने सुरू केलेल्या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या मोहिमेमुळे सर्वसामान्यांना स्वस्त, दर्जेदार तूरडाळ मिळण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया अनेक गृहिणींनी दिली. 

Web Title: Turdal shortage in rationing shops