तूरडाळीचे अनोखे मार्केटिंग 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेणे बंद करू नये. त्यालाही फायदा मिळावा आणि ग्राहकांची पिळवणूक थांबवावी, यासाठी मी हे काम करत आहे. 
- राजन मुकादम

कल्याण - तूरडाळीचे भाव अनेक ठिकाणी वेगवेगळे असून त्याचा दर्जासुद्धा घसरलेला आहे. नागरिकांना स्वस्तात दर्जेदार तूरडाळ मिळावी यासाठी डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते राजन मुकादम यांनी वर्धा आणि यवतमाळ येथून फटका डाळ आणली असून ती कल्याण-डोंबिवली शहरात सायकलवर फिरत "ना नफा ना तोटा' या तत्त्वावर ते विकत आहेत. 

शहरातल्या दुकान, मॉलमध्ये तूरडाळ 100 ते 200 रुपये किलोने विकली जाते. मात्र फटका तूरडाळची चवच वेगळी आहे. ही डाळ फक्त मुंबई, ठाणे, कल्याण,डोंबिवलीतील विशिष्ट दुकानांमध्ये 180 ते 200 रुपये किलोने मिळते. अनेक शेतकऱ्यांनी अनेक डाळींचे उत्पादन बंद केल्याने व्यापारी वर्गाचे फावले. डाळीचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान; तर ग्राहकांची पिळवणूक होत असल्याचा आरोप मुकादम यांनी केला आहे. सहा महिन्यांपासून मुकादम दोन्ही शहरातील चौक न्‌ चौक सायकलवर फिरून डाळ विकत आहेत. ही डाळ 130 रुपये किलोने विकली जात आहे. 

Web Title: turdal unique marketing