Loksabha 2019 : मतदानासाठी मतदार ओळखपत्रासह 12 दस्तऐवज ग्राह्य 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेला निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले वैध मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य 11 दस्तऐवजांचे पर्याय आहेत. ए

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेला निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले वैध मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य 11 दस्तऐवजांचे पर्याय आहेत. एकूण 12 प्रकारच्या छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक दस्तऐवज मतदारांनी सोबत न्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
 
मतदार यादीत नाव आणि वैध मतदार ओळखपत्र असलेल्या व्यक्तींना आपला लोकशाही हक्क बजावता येईल. मतदारसंख्या व लोकसभा मतदारसंघांची संख्या या निकषांवर मुंबई उपनगर हा राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील सर्व चार लोकसभा मतदारसंघांत सोमवारी (ता. 29) सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होईल. सायंकाळी 6 वाजण्यापूर्वी मतदान केंद्रांबाहेरील रांगेत उभ्या असणाऱ्या मतदारांना आपला लोकशाही हक्क बजावता येईल, असे जिल्हाधिकारी कुर्वे यांनी सांगितले. मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी वैध मतदार ओळखपत्रासह 12 पर्याय ग्राह्य धरले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. 

मतदार ओळखपत्र नसल्यास... 
पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम अथवा सार्वजनिक मर्यादित कंपनी), बॅंक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेली खातेपुस्तिका, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरअंतर्गत देण्यात आलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपुस्तिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेली निवृत्तिवेतन पुस्तिका, खासदार-आमदार किंवा विधान परिषद सदस्यांना दिलेले ओळखपत्र आणि आधार कार्ड यापैकी एक दस्तऐवज ग्राह्य धरला जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve documents with voter ID card valid for voting