file photo
file photo

जुन्‍या ठाण्‍याचा नव्‍याने विकास!

ठाणे : शहरात अधिकृत अथवा अनधिकृत धोकादायक इमारतींना दिलासा मिळण्यासाठी क्‍लस्टर योजना राबविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. त्याचवेळी मुख्य ठाण्यातील जुन्या अधिकृत धोकादायक इमारतींचा विषय मात्र अतिरिक्त टीडीआर मिळत नसल्याने रखडला आहे. या रखडलेल्या पुनर्विकासाला आता चालना मिळणार आहे. महापालिकेकडून एकाच वेळी 21 रस्ते नऊ मीटर केले जाणार असल्याने त्याचा लाभ जुन्या ठाण्यातील पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो ठाणेकरांना होणार आहे.

ठाण्यातील एकूण एकवीस रस्ते नऊ मीटर करण्याचा प्रस्ताप महापालिकेकडून तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्यास जुन्या ठाण्यातील सुमारे 3 हजार इमारतींना त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर जुन्या ठाण्यातील रस्ते एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुंद होणार असल्याने वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे. 
गेल्या 20 वर्षांत ठाणे शहराचे प्रचंड नागरीकरण होत आहे. त्यातही घोडबंदर, कळवा, मुंब्रा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात नव्याने गृहसंकुले उभी राहिलेली आहेत. त्यातही घोडबंदर परिसरात तर मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहे.

येथील मोकळ्या जमिनीमुळे अतिरिक्त टीडीआर उपलब्ध होत असल्याने येथील इमारतींची संख्या वाढतेच आहे. मात्र त्या उलट जागेची उपलब्धता नसल्याने जुन्या ठाण्यातील अधिकृत इमारतींचा पुनर्विकास संथगतीने होत आहे. मूळात येथे अतिरिक्त टीडीआर मिळत नसल्याने कमी फायदा होत असल्याने अनेक बांधकाम व्यावसायिक या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासापासून चार हात लांब राहणे पसंत करीत आहेत. त्यामुळे ठाणे शहर वसण्यास ज्या ठिकाणापासून सुरुवात झाली तेथील नागरिकच पुनर्विकासापासून दूर असल्याचे चित्र आहे, पण आता यामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. 


या भागांचा होणार विकास 
राज्य सरकारच्या नव्या टीडीआर धोरणामुळे जुन्या ठाण्यातील ब्राह्मण सोसायटी, भास्कर कॉलनी, उथळसर, कोलबाड, विष्णूनगर, बी-केबीन, चरई आणि राबोडी या भागातील इमारतीचा पुनर्विकास रखडला आहे. जुन्या ठाण्यात सरासरी सहा मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते आहेत. त्यामुळे या भागातील जुन्या इमारतींना टीडीआर मिळण्याचा मार्ग बंद झाल्याने त्यांचा पुनर्विकास गेल्या काही वर्षांपासून रखडला आहे. 

सर्व हरकती निकाली 
महापालिका विकास आराखड्यात नऊ मीटरचे रस्ते दर्शविण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तयार केले होते. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाली होती. त्यानंतर या प्रस्तावाबाबत नागरिकांच्या हरकती आणि सूचना प्रशासनाने मागविल्या होत्या. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रशासनाने ही प्रक्रिया सुरू केल्यावर त्यामध्ये केवळ चौदा हरकती प्रशासनाकडे आलेल्या आहेत. त्यावर महापालिकेच्या सहायक संचालक नगररचनाकार यांनी सुनावणी घेऊन त्या निकाली काढल्या आहेत. त्यामुळे आता या विषयातील अडथळे दूर झाल्यानंतर नऊ मीटरच्या अतिरिक्त टीडीआरचा विषय अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव पुढील सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com