एसटीच्या 20 फेऱ्या ऐन सुट्टीत बंद कर्मचाऱ्यांच्या बदल्या; प्रवाशांचे हाल 

ST bus
ST bus

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस चालक आणि वाहकांना इच्छित स्थळी बदली दिल्यामुळे मुंबईत चालक-वाहकांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई-हुबळी शिवशाही आणि मुंबई-हैदराबाद या आंतरराज्य मार्गांसह 20 एसटी बस सेवा बंद झाल्या आहेत. परिणामी उन्हाळ्याच्या सुटीत गावाला, सहल आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. याचा सर्वाधिक फटका प्रत्येकी सहा बस सेवा बंद झालेल्या अलिबाग आणि भिवंडी परिसरातील प्रवाशांना बसला आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी एसटी महामंडळाने घाईघाईत बदली प्रक्रिया राबवली. महामंडळाने 3307 वाहक-चालकांची इच्छित स्थळी बदली करून त्यांना दिलासा दिला, परंतु मुंबई विभागातील बदली झालेल्या वाहक-चालकांच्या रिक्त जागांवर अन्य ठिकाणांहून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे नियोजन झाले नाही. त्यामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या बस चालक-वाहकांअभावी आगारातच उभ्या आहेत. हजारो कोटींच्या तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला अनेक मार्गांवरील फेऱ्या बंद झाल्यामुळे आणखी नुकसान सहन करावे लागत आहे. 

एसटी महामंडळाच्या मुंबई विभागात मुंबई सेंट्रल, कुर्ला नेहरू नगर, परळ, पनवेल आणि उरण अशी एकूण पाच आगारे आहेत. या पाचही आगारांतील कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे. त्यांच्यात मुंबई सेंट्रलमधील 85, परळमधील 19, पनवेल येथील 14, कुर्ला आगारातील 15 आणि उरण येथील 14 वाहक व चालकांचा समावेश आहे. एसटी महामंडळाने उन्हाळी सुटीच्या काळात एकाही वाहक अथवा चालकाला रजा न देण्याचा आदेश जारी केला आहे, त्यामुळे वाहक-चालक मानसिक दबावात काम करत असल्याचे सांगितले जाते. 

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेक मार्गांवरील बस फेऱ्या बंद झाल्याने एसटी महामंडळाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. उन्हाळ्याची सुटी आणि लग्नसराईत एसटी महामंडळ दरवर्षी अतिरिक्त बसगाड्या सोडते. या वर्षी मात्र वाहक-चालक उपलब्ध नसल्यामुळे एसटी महामंडळाची डोकेदुखी वाढली आहे. 

किमान दोन महिने प्रतीक्षा 
एसटी महामंडळात नवीन नियुक्ती झालेल्या उमेदवारांना बदलीमुळे रिक्त जागांवर पाठवले जाणार आहे, परंतु त्यांचे प्रशिक्षण अद्याप झालेले नाही. त्यांना प्रशिक्षण पूर्ण करून रुजू होण्यास सुमारे दोन महिने लागतील, अशी माहिती एसटी मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तोपर्यंत उन्हाळी सुटीचा हंगाम संपणार असल्यामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. 

बंद झालेले मार्ग 
मुंबई सेंट्रल आगार : नारायणगाव, हैदराबाद, पाली, कराड, सोलापूर, हुबळी (शिवशाही), अलिबाग आणि भिवंडी भागांतील कमी अंतराचे प्रत्येकी सहा मार्ग. 
परळ आगार : शिर्डी, अहमदपूर, वारूगड, बेल्हा, जळव, केंजळवाडी, बाभूळवाडा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com