सयामी जुळ्या बहिणी रिद्धी-सिद्धी झाल्या पाच वर्षांच्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

शिवडी - परळ पूर्वेतील बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात सयामी जुळ्या असलेल्या रिद्धी-सिद्धी यांचा पाचवा वाढदिवस मंगळवारी (ता. ८) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रिद्धी-सिद्धी यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने वाडिया रुग्णालयाच्या एनआयसीयूला २० व्हेंटिलेटर्सची भेट देण्यात आली.

शिवडी - परळ पूर्वेतील बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात सयामी जुळ्या असलेल्या रिद्धी-सिद्धी यांचा पाचवा वाढदिवस मंगळवारी (ता. ८) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रिद्धी-सिद्धी यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने वाडिया रुग्णालयाच्या एनआयसीयूला २० व्हेंटिलेटर्सची भेट देण्यात आली.

वाडिया समूहाचे नेस वाडिया यांच्यासोबत रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला, नगरसेवक दत्ताराम पोंगडे, प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक सचिन पडवळ, नगरसेविका सिंधू मसुरकर, श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर आदी मंडळी वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘भारतात दरवर्षी सुमारे आठ लाख नवजात बालके दगावतात. जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी पाहता सुमारे ३५ लाख बालके अपरिपक्व अवस्थेत जन्माला येतात. वयाचा महिना ओलांडण्याआधी सुमारे तीन लाख नवजात बालकांचा मृत्यू होतो. मुंबईतील रुग्णालयात व्हेंटिलेटर्सची कमतरता असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना त्याच्या शोधात फिरावे लागते. उत्तम दर्जाची आरोग्यसेवा देण्याचा आमचा उद्देश आहे. 

लहान मुलांना असलेल्या दीर्घकालीन आजारामुळे त्यांना व्हेंटिलेटर्सची गरज भासते. त्याची दखल घेऊन आम्ही बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने हे पाऊल टाकले आहे,’ असे नेस वाडिया म्हणाले.दोघींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बच्चे कंपनी, रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.

माफक दरात एनआयसीयूची सुविधा
सार्वजनिक आणि धर्मादाय रुग्णालयाव्यतिरिक्त साधारण तीन ते चार रुग्णालयांतच व्हेंटिलेटर्सची सुविधा उपलब्ध आहे; मात्र त्या खासगी स्वरूपाच्या असल्याने रुग्णांसाठी खर्चिक आहेत. वाडियाच्या एनआयसीयूमध्ये आता व्हेंटिलेटर्सच्या सेवेतील खाटा वाढल्याने अतिदक्षता विभागातील प्रतीक्षा यादी कमी होऊन माफक दरात तातडीची अतिदक्षता सेवा पुरवता येईल, असे डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.

Web Title: twins riddhi-siddhi five-year