उल्हासनगरात महापौरच्या निवडणुकीला धक्कादायक कलाटणी

ulhasnagar
ulhasnagar

उल्हासनगर : ऐन महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर फुटलेल्या साईपक्षाची विभागणी झाली असून एका गटाने शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेच्या बळावर साईच्या ज्योती बठीजा यांनी महापौर पदाचा उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी महापौरांच्या प्रमुख दावेदार असणाऱ्या भाजपाच्या कलानी परिवारातील सून पंचम कलानी यांना आव्हान देण्यात आले आहे. महापौर पदाची निवडणूक 28 सप्टेंबरला होत आहे. दोघांकडे असलेली नगरसेवकांची आकडेवारी नुसार घोडेबाजार-फोडाफोडी होणार असल्याने ही निवडणूक काटेंकी टक्कर ठरणार आहे.

शिवसेना-साईपक्ष व इतर पक्ष अशा आघाडीच्या उमेदवार ज्योती बठीजा यांनी पालिका सचिव विकास चव्हाण यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. तेव्हा शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधीपक्षनेते धनंजय बोडारे, गटनेते रमेश चव्हाण आदी तर पंचम ओमी कलानी यांचा अर्ज सादर करतेवेळी उपमहापौर जीवन इदनानी, भाजपा जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, माजी महापौर मीना आयलानी, सभागृहनेते जमनादास पुरस्वानी, राजेश वधारिया आदी उपस्थित होते.

पालिकेत भाजपा-साईपक्षाची सत्ता आहे. कराराप्रमाणे प्रथम सव्वा वर्ष भाजपाच्या मीना आयलानी व त्यानंतर पंचम कलानी असा महापौर कालावधी ठरवण्यात आला होता.त्यानुसार मिना आयलानी यांनी राजीनामा दिल्याने पंचम कलानी यांचा महापौरांचा मार्ग मोकळा झालाहोता. साई पक्ष्याचे 12 नगरसेवक आहेत.त्यापैकी बठीजा समर्थक असलेल्या 7 नगरसेवकांचा पंचम कलानी यांना विरोध असल्याने त्यांनी शिवसेनेशी हातमिळवणी करून उमेदवारी अर्ज सादर केल्याने महापौर निवडणुकीत अनपेक्षित अशी धक्कादायक कलाटणी मिळाली आहे.शिवसेना-साईपक्ष (दुसरा गट)-राष्ट्रवादी-आरपीआय आठवले-काँग्रेस-भारिप-पीआरपी असे मिळून 40 संख्याबळ होत आहे.तर भाजपा-साई असे 38 संख्याबळ असल्याने घोडेबाजार-फोडाफोडी होणार असून बहुतांश नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहे.

साईपक्षाच्या विभागणी झालेल्या एका गटाने मदतीची हाक दिल्याने शिवसेनेने त्यांना पाठबळ दिले आहे.आम्ही ज्योती बठीजा यांना निवडून आणण्यासाठी सर्व पणाला लावणार. अशी प्रतिक्रिया गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केली.तर पंचम कलानी ह्याच महापौर होणार वेट अँड वॉच करा असा विश्वास टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com