अडीच वर्षांच्या मुलाची चार तासांत सुटका 

अडीच वर्षांच्या मुलाची चार तासांत सुटका 

नवी मुंबई - उलवे भागात राहणाऱ्या हसिना अब्दुल हमिद शेख (25) या महिलेच्या अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण करून नेणाऱ्या दाम्पत्याला एनआरआय सागरी पोलिसांनी अवघ्या चार तासांत पकडून मुलाची सुखरूप सुटका केली आहे. सरोज जिनत राव (27) आणि जिनत बचरसिंग राव (28) असे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव असून, त्यांनी आर्थिक देवाणघेवाणीतून शेख यांच्या बालकाचे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलिस उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली. 

तक्रारदार हसिना शेख आणि आरोपी राव दाम्पत्य हे परस्परांच्या परिचयाचे आहेत. हसिना शेखचा पती अब्दुल हमिद शेख याच्याकडे दोन गाड्या असल्याने त्यातील एक कार त्याने आरोपी जिनत राव याला 65 हजार रुपयांना विकली होती. तसेच त्या कारवरील कर्ज राव याच्यावर ट्रान्स्फर केले होते. या व्यवहारातील काही रकमेची देवाणघेवाण बाकी असतानाच शनिवारी सायंकाळी आरोपी सरोज राव पतीसह हसिना शेख हिच्या उलवे येथील घरी गेली होती. या वेळी तिने हसिना शेख हिच्या अडीच वर्षांच्या मुलाला आपल्यासोबत नेले. त्यानंतर तिने व तिच्या पतीने मुलाचे अपहरण करून पलायन केले. हा प्रकार हसिनाच्या लक्षात आल्यानंतर तिने तत्काळ एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी तत्काळ पथके रवाना केली. आरोपी राजस्थानातील जालोर येथील असल्याने ते कारने राजस्थानला जाण्याची शक्‍यता लक्षात घेऊन महामार्गावरील सर्व टोल नाक्‍यांशी संपर्क साधून आरोपींच्या वाहनाची माहिती दिली. दरम्यान, आरोपी राव दाम्पत्य मुलासह वापी, वलसाड, सूरत, भरूच मार्गे राजस्थानला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा व एसओजीच्या पथकाशी समन्वय साधला. त्यामुळे रात्री 10 च्या सुमारास भरूच स्थानिक गुन्हे शाखा व एसओजीच्या पथकाने राव दाम्पत्याला भरूच टोल नाक्‍यावर पकडले. त्यानंतर चौकशीत अब्दुल हमिद शेख यांच्यासोबत वाहनाच्या खरेदी-विक्रीच्या आर्थिक देवाणघेवाणीतून त्यांनी शेख यांच्या मुलाचे अपहरण केल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com