दोन मोटरसायकलस्वारांचा मृत्यू ; पोलिसांना पाहून पळ काढताना दुर्घटना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

पश्‍चिम आणि पूर्व उपनगराला जोडणाऱ्या वांद्रे-वरळी सागरी सेतूवर स्टंटबाजीचे प्रकार वाढले होते. अशा स्टंटबाजांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. तरीही पोलिसांची नजर चुकवून स्टंटबाजीसाठी अनेक जण सागरी सेतूवर येतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सेतू परिसरात वांद्रे पोलिसांचे विशेष पथक तैनात असते.

मुंबई : पोलिसांना पाहून विरुद्ध दिशेने पळ काढणाऱ्या मोटरसायकलस्वाराने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये मृत झालेले दोघेही अल्पवयीन असून, अखिल गुलाम गौस (17) ओसामा आशादी कुरेशी (17) अशी त्यांची नावे आहेत; तर युनूस जोसेफ ताडी हा जखमी झाला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. 

पश्‍चिम आणि पूर्व उपनगराला जोडणाऱ्या वांद्रे-वरळी सागरी सेतूवर स्टंटबाजीचे प्रकार वाढले होते. अशा स्टंटबाजांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. तरीही पोलिसांची नजर चुकवून स्टंटबाजीसाठी अनेक जण सागरी सेतूवर येतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सेतू परिसरात वांद्रे पोलिसांचे विशेष पथक तैनात असते. शुक्रवारी पहाटे माहीम परिसरात राहणारा अखिल हा मोटरसायकलने सेतूच्या झेंडा परिसराजवळ आला. झेंडा परिसराजवळ गस्तीवर असलेल्या पोलिसांची गाडी पाहून अखिल घाबरला.

पोलिसांना पाहून त्याने विरुद्ध दिशेने मोटरसायकल नेली. तेव्हा कुर्ला परिसरात राहणारा ओसामा हा त्याचा मित्र युनूससोबत मोटरसायकलने सेतू परिसराजवळ आला होता. समोरून आलेल्या अखिलच्या मोटरसायकलने ओसामाच्या मोटरसायकलला धडक दिली. 

या धडकेत अखिल हा जागीच ठार झाला होता, तर ओसामा आणि युनूस हे दोघे जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच वांद्रे पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी ओसामा आणि युनूसला उपचाराकरिता भाभा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान ओसामाचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. 

Web Title: Two Bike rider have been dead