धक्कादायक ! उपचाराअभावी भिवंडीत दोन बालकांचा मृत्यू

शरद भसाळे
Tuesday, 11 August 2020

खासगी रुग्णालयांच्या गलथान कारभारामुळे आपल्या मुलांचा जीव गेल्याचा आरोप या दोन्ही मुलांच्या नातेवाईकांनी केला आहे.

भिवंडी : कोरोना संसर्गाच्या काळात खासगी रुग्णालयांमध्ये वेळीच उपचार न मिळाल्याने अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यानंतर राज्य सरकारने खासगी रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्याचे सक्त निर्देश दिले होते. मात्र, सरकारच्या या निर्देशांकडे खासगी रुग्णालये आजही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे भिवंडीतील घटनेवरून स्पष्ट होत आहे. खासगी रुग्णालयांनी उपचार नाकारल्याने भिवंडीतील दोन बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत शहर पोलिसांनी नोंद घेऊन तपास सुरू केला आहे. 

महत्वाची बातमी : ठाण्यापेक्षा कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे ऍक्‍टिव्ह रुग्ण अधिक 

शुक्रवारी (ता. 7) शहरातील कल्याणरोड येथील अप्सरा टॉकीज परिसरातील फिजा बेकरी येथे राहणाऱ्या जमशेद अन्सारी यांचा 14 महिन्यांचा मुलगा हाशिर हा पाण्याच्या टबमध्ये पडल्याने त्याला दुखापत झाली होती. तर त्याच दिवशी याच परिसरात राहणारे गौस शेख यांचा तीन महिन्यांचा मुलगा सैफ याची मालिश करताना त्याने दुधाची उलटी केली. 14 महिन्यांचा हाशिर व अवघ्या तीन महिन्यांचा सैफ या दोघांनाही त्यांच्या पालकांनी शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी फिरवले. मात्र, एकाही खासगी रुग्णालयाने या मुलांना उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. 

महत्वाची बातमी : BMC चा खासगी रुग्णालयाला दिलासा; रुग्णांकडून भरमसाठ बिले वापरल्याने केली होती कारवाई

या दरम्यान काही खासगी रुग्णालयांनी ऑक्‍सिजन नसल्याचे, तर काहींनी रुग्णालयांमध्ये आवश्‍यक सुविधा नसल्याचे कारण दिले. त्यानंतर रात्री 12 च्यादरम्यान या दोन्ही बालकांना त्यांच्या नातेवाईकांनी धामणकर नाका येथे महापालिकेने ताब्यात घेतलेल्या 'ऑरेंज' या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्‍टरांनी या दोन्ही बालकांना मृत घोषित केले. खासगी रुग्णालयांच्या गलथान कारभारामुळे आपल्या मुलांचा जीव गेल्याचा आरोप या दोन्ही मुलांच्या नातेवाईकांनी केला आहे. मुलांवर उपचार न करणारे खासगी रुग्णालये जबाबदार असून, या रुग्णालयांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे करत आहेत. 

(संपादन : वैभव गाटे)

two children die in Bhiwandi due to lack of treatment


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two children die in Bhiwandi due to lack of treatment