नौदलात सव्वादोन कोटींचा गैरव्यवहार 

अनिश पाटील
बुधवार, 9 मे 2018

मुंबई - नौदलातील कमांडर आणि कमोडोर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून हुतात्मा जवानांच्या कुटुंब कल्याणासाठी राखीव असलेल्या निधीवर डल्ला मारणाऱ्या अपर डिव्हीजन क्‍लार्क सुशांत सुरेश गंगावणे (वय 34) याला आर्थिक गुन्हे शाखेने आज अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासानुसार दोन कोटी 19 लाखांचा हा गैरव्यवहार असल्याचा प्राथमिक अंदाज असून, त्याची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता आहे. 

नौदलाच्या कॅंटीनमधील वस्तूच्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतील काही हिस्सा जवान आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंब कल्याणासाठी राखून ठेवलेला असतो. तसेच यातून नौदलाच्या कर्मचाऱ्यांच्या विशेष मुलांसाठी असलेल्या संकल्प शाळेलाही निधी पुरवला जातो. कुटुंब कल्याण विभागात कार्यरत असलेल्या सिनिअर स्टाफ ऑफिसर सोनल द्रविड यांनी संकल्प शाळेच्या निधीबाबत तपासणी केली असता, 2017 मध्ये तीन महिन्यांत दोन वेळा या योजनेतून प्रत्येकी दोन लाख तीन हजार रुपये शाळेला देण्यात आल्याची नोंद होती; मात्र शाळेत विचारणा केली असता फक्त एकदाच दोन लाख तीन हजार रुपयेच मिळाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर द्रविड यांनी विभागाच्या खात्याची बॅंक स्टेटमेंटची माहिती घेतली असता, धनादेश व आरटीजीएसद्वारे दोन कोटी 19 लाख रुपये काढण्यात आल्याचे समजले. कॅश रजिस्टरच्या नोंदीची पडताळणी केली असता, संबंधित संशयित व्यवहाराच्या नोंदी आरोपी गंगावणेने केल्या होत्या. तसेच धनादेश जमा करण्याचे कामही गंगावणेकडे होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे याप्रकरणी गंगावणेला अटक करण्यात आली. या प्रकरणातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाचीही तपासणी पोलिस करत आहेत. 

116 धनादेशांमार्फत गैरव्यवहार 
नौदलाच्या पडताळणीत, सात वर्षांत 116 सेल्फ चेकद्वारे (धनादेश) दोन कोटी 19 कोटींची रक्कम काढण्यात आली आहे. त्यासाठी 2011 ते 2017 या कालावधीत त्या विभागाचे अधिकारी असलेल्या कमांडर व कमोडोर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. सुमारे 35 धनादेशांवर अशाप्रकारे बोगस स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

यांच्यासाठी असतो निधी 
- नौदलाचे निवृत्त अधिकारी जवान 
- हुतात्म्यांच्या पत्नी आणि वारस 
- कर्मचाऱ्यांचे पाल्य 
- संकल्प शाळा 

Web Title: Two crores of fraud in the navy