मध्य वैतरणा जलाशयात दोन मृतदेह आढळले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, मध्य वैतरणा धरणातील जलाशयात दोन मृतदेह तरंगत असल्याची खबर मिळाली. तातडीने घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह जलाशयातून बाहेर काढले.

मोखाडा : मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी मोखाड्यात बांधण्यात आलेल्या मध्य वैतरणा जलाशयात स्त्री व पुरुष जातीचे दोन मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सहा महिन्यात ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे मध्य वैतरणा परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, मध्य वैतरणा धरणातील जलाशयात दोन मृतदेह तरंगत असल्याची खबर मिळाली. तातडीने घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह जलाशयातून बाहेर काढले. साधारणतः 50 ते 55 वयोगटातील स्त्री व पुरुष जातीचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.

दरम्यान, मृतदेहांची अवस्था अतिशय बिकट असल्याने त्याच ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले आहे. सहा महिन्यात मध्य वैतरणा जलाशयात मृतदेह आढळून येण्याची ही दुसरी घटना घडली आहे. सदरची घटना ही हत्या आहे की आत्महत्या त्याचा तपास मोखाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश सोनवणे करत आहेत. 

Web Title: two dead bodies found in vaitarna dam