मुंबईत शौचालय खचल्याने दोघे ठार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

भांडुप : भांडुप पिंपळेश्‍वर कॉलनीमधील साई सदन चाळीतील सार्वजनिक शौचालय खचल्याने दोन जण ठार झाले. यामध्ये महिला आणि एका इसमाचा समावेश आहे. 

भांडुप : भांडुप पिंपळेश्‍वर कॉलनीमधील साई सदन चाळीतील सार्वजनिक शौचालय खचल्याने दोन जण ठार झाले. यामध्ये महिला आणि एका इसमाचा समावेश आहे. 

सकाळी सुमारे 6.30 च्या दरम्यान शौचास गेलेल्या लोबाबेन जेठवा (वय 42) व बाबूलाल देवासे वय (45) यांच्यावर शौचालयाचा स्लॅब पडून दोघेही यात अडकले गेले. शौचालय खचल्याने त्याचा मोठा आवाज झाला. या आवाजाने आणि शौचालयाच्या ढिगाऱ्याखाली कोणी तरी अडकल्याचा संशय व्यक्‍त करत रहिवाशांनी डेब्रिज काढण्यास सुरुवात केली; मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात मल असल्याने त्यांनी भांडुप पोलिस ठाणे, अग्निशमन दल व पालिका सफाई कर्मचाऱ्यांना घटनेची कल्पना दिली. कर्मचाऱ्यांच्या चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. 

या कॉलनीत साई सदन ए, बी व सी, दर्शन सोसायटी व वसंतकोर विला या चाळी आहेत. सुमारे 150 रहिवासी या चाळींमध्ये राहत असून त्यांच्याकडून या शौचालयाचा वापर केला जातो. या शौचालयात एकूण 20 जणांची आसन व्यवस्था होती. सदर शौचालय 30 वर्षांपूर्वीचे जुने असून काही वर्षांपूर्वी केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. नुकतीच येथील रहिवाशांनी शौचालयाच्या पुनर्बांधणीसाठी राजकीय पक्षांकडे मागणी केली होती. या शौचालयाच्या बांधकामास लवकरच नव्याने सुरुवात करण्यात येणार होती; मात्र त्याआधीच ही भयानक दुर्घटना घडली. 

तर मोठा अनर्थ घडला असता 
सध्या शाळकरी मुलांना उन्हाळी सुट्ट्या आहेत. त्यामुळे त्यांना शाळेची घाई नसते; मात्र हीच घटना जर एक महिनाभरापूर्वी घडली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. राजकीय अनास्था आणि सरकारी चालढकल यामुळे दोन व्यक्‍तींचा बळी गेला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्‍त केली आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Two dead in Mumbai as toilet collapsed